महापौर काँग्रेसचाच
By Admin | Published: November 4, 2015 12:47 AM2015-11-04T00:47:50+5:302015-11-05T00:11:10+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : पहिल्या वर्षी उपमहापौर, ‘स्थायी’ राष्ट्रवादीकडे
कोल्हापूर : महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा टाकत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाकडे महापौरपद राहणार असून, उपमहापौरपद हे राष्ट्रवादीला देण्यात येणार आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देऊन सत्तेच्या सारिपाटावरून काँग्रेसला बाजूला ठेवण्याचा प्रयोग पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करून पाहिला; परंतु तो अयशस्वी ठरला.
महापालिका निवडणुकीत काँग्रेस हाच सर्वाधिक २७ जागा जिंकणारा पक्ष ठरला. पाठोपाठ त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादीने पक्षाने १५ जागा मिळविल्या आहेत. त्यामुळे या दोन पक्षांची आघाडी होणार हे स्पष्टच झाले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मंगळवारी स्वतंत्र बैठका झाल्या.
काँग्रेस कार्यालयातील बैठकीस माजी मंत्री पतंगराव कदम, सतेज पाटील, पी. एन. पाटील, प्रल्हाद चव्हाण, आदी नेते उपस्थित होते; तर राष्ट्रवादीच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयातील बैठकीस माजी मंत्री हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, आदी उपस्थित होते. दोन्ही पक्षांतर्फे नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही काँग्रेसचे नेते एका हॉटेलवर एकत्र जमले.
अनौपचारिक गप्पा संपल्यानंतर सर्वजण मुख्य विषयाकडे वळले. राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांनी कोणतेही आढेवेढे न घेता राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या वर्षी काँग्रेसचा महापौर करण्यावर सहमती झाली. त्यानंतर उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापतिपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला.
सर्वाधिक जागांमुळे पदांच्या बाबतीत काँग्रेसला झुकते माप देण्यावर दोन्ही पक्षांत सहमती झाली; परंतु कोणती पदे कोणत्या पक्षाने घ्यायची याचा निर्णय घेण्याचे अधिकार सतेज पाटील व मुश्रीफ यांना दिले आहेत. महापौर, उपमहापौर निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यावर निर्णय घेण्याचे ठरले. ‘स्वीकृत नगरसेवक’ याबाबतही चर्चा झाली. पराभूत व्यक्तीला ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून घ्यायचे नाही, असे दोन्ही पक्षनेत्यांनी ठरविले. हा विषयही महापौर, उपमहापौर निवडीनंतरच्या चर्चेत घेण्याचे ठरले.
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, तसेच चारही विभागीय समिती सभापती अशी पदे आहेत. उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदाशिवाय अन्य कोणते पद राष्ट्रवादीला मिळेल का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
पालकमंत्र्यांचा प्रयत्न अयशस्वी
ताराराणी आघाडी व भाजप युतीला या निवडणुकीत ३२ (१९ + १३) जागा मिळाल्या आहेत. त्यांना सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ नऊ जागा कमी आहेत. त्यामुळे भाजपचा महापौर करण्याचे स्वप्न भंगले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपची सत्ता आणण्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. पालकमंत्रीे सत्तेची समीकरण जुळवून आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन राष्ट्रवादीला आपल्यासोबत घेण्याची विनंती केली; परंतु आता या गोष्टी अशक्य असल्याचे सांगून महाडिक काका- पुतण्यांनी त्यास नकार दिला. शेवटी पालकमंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधून तशी विनंती केल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. (प्रतिनिधी)
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची ‘नैसर्गिक मैत्री’ असून, गेल्या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्तेत राहून मोठी विकासकामे केली आहेत. त्यामुळे यावेळीही या दोन्ही पक्षांनी एकत्र राहून विकासकामे करावीत, असाच जनतेचा कौल आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आघाडी करण्यासंदर्भात मी व्यक्तिश: फोनवर बोललो. त्यांनी मान्यता दिल्यानंतर आम्ही स्थानिक पातळीवर एकत्र आलो आहोत.
- आमदार पतंगराव कदम
गेल्या पाच वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे केली आहेत. यापुढील काळातही अशीच कामे करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. सध्या आम्ही अपूर्र्ण कामे पूर्ण करण्यावर जोर देणार आहोत. जनतेला दिलेल्या अजेंड्यानुसार कामे केली जातील.
- सतेज पाटील, माजी मंत्री
आम्ही कोल्हापुरात एकत्र आघाडी केली म्हणून विदर्भाचे मुख्यमंत्री कोल्हापूरवर अन्याय करतील, निधी देणार नाहीत; पण राज्य व केंद्र सरकारकडून निधी खेचून आणण्यात आम्ही यशस्वी होऊ.
- हसन मुश्रीफ, माजी मंत्री
नव्या सभागृहातील काँग्रेस- राष्ट्रवादीचे बलाबल
काँग्रेस : २७ + २ अपक्ष = २९
(राहुल माने व नीलोफर आजरेकर)
राष्ट्रवादी काँग्रेस : १५
एकूण सदस्य संख्या : ४४