महापौर काँग्रेसचाच : कोल्हापूर महापालिका -शोभा बोंद्रे यांची निवड; राष्ट्रवादीचे महेश सावंत उपमहापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:37 AM2018-05-26T01:37:34+5:302018-05-26T01:37:34+5:30

 Mayor of Congress: Kolhapur municipal corporation - Shobha Bondre elected The Deputy Mayor of NCP Mahesh Sawant | महापौर काँग्रेसचाच : कोल्हापूर महापालिका -शोभा बोंद्रे यांची निवड; राष्ट्रवादीचे महेश सावंत उपमहापौर

महापौर काँग्रेसचाच : कोल्हापूर महापालिका -शोभा बोंद्रे यांची निवड; राष्ट्रवादीचे महेश सावंत उपमहापौर

Next
ठळक मुद्देबिनआवाजाचा बॉम्ब फुटलाच नाही; भाजप-ताराराणीचा पराभव

कोल्हापूर : देशात आणि राज्यात सत्तेत असल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत बहुमत नसतानाही महापौर व उपमहापौर आपल्याच आघाडीचे करायला निघालेल्या भाजप-ताराराणी आघाडीची राजकीय खुमखुमी शुक्रवारी सर्वसामान्य नगरसेवकांनीच उतरवली.

घोडेबाजार करून ही पदे पदरात पाडून घ्यायची हे भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांचे मनसुबे नगरसेवकांच्या प्रामाणिकपणामुळे उधळले. त्यामुळेच अपेक्षेप्रमाणे महापौरपदी काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे तर उपमहापौरपदी राष्टवादी काँग्रेसचे महेश आबासो सावंत बहुमताने विजयी झाले.
राज्यातील सत्तेच्या तसेच घोडेबाजाराच्या जोरावर भाजप-ताराराणी आघाडीने महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला होता; परंतु शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी त्यांचा डाव उधळून लावण्यास मोलाची मदत केली. शिवसेनेने गुरुवारी रात्रीच या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीतील उरली-सुरली चुरसही संपुष्टात आली.

त्यानंतर शुक्रवारी सकाळी झालेल्या विशेष सभेत झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस-राष्टÑवादीने विजयाची केवळ औपचारिकता पूर्ण केली.८१ सदस्य असलेल्या सभागृहात काँग्रेस-राष्टÑवादीचे ४४ तर भाजप - ताराराणीचे ३३ नगरसेवक आहेत तर शिवसेनेचे ४ नगरसेवक आहेत. शिवसेनेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार शोभा पंडितराव बोंद्रे तर राष्टÑवादी पक्षाचे उपमहापौरपदाचे उमेदवार महेश आबासो सावंत अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. बोंद्रे यांनी ताराराणीच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांचा तर सावंत यांनी भाजपच्या कमलाकर यशवंत भोपळे यांचा पराभव केला.

सकाळी अकरा वाजता महापालिकेची विशेष सभा पीठासीन अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. प्रथम महापौरपदाची निवडणूक झाली. शोभा बोंद्रे, रूपाराणी निकम यांच्यासह शिवसेनेच्या प्रतिज्ञा महेश निल्ले-उत्तुरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. तो अर्ज त्यांनी सभागृहात मागे घेतला. त्यानंतर त्या सभागृहातून निघून गेल्या. बोंद्रे व निकम यांच्यात निवडणूक झाली. हातवर करून बोंद्रे यांना ४४ तर निकम यांना ३३ मते मिळाली.

त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. उपमहापौरपदासाठी महेश सावंत, कमलाकर भोपळे यांच्यासह शिवसेनेच्या अभिजित विश्वास चव्हाण यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे पत्र प्रतिज्ञा निल्ले यांच्यामार्फत पीठासीन अधिकाऱ्याकडे दिले. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा असेल तर उमेदवार किंवा सूचक, अनुमोदक यांच्यापैकी एकाने सभागृहात उपस्थित राहून विहीत नमुन्यातील अर्ज भरून द्यायचा असतो; पण चव्हाण सभागृहातच आले नसल्याने त्यांचे नाव निवडणूक उमेदवारांच्या यादीत तसेच राहिले. हातवर करून मतदान झाले तेव्हा सावंत यांना ४४, भोपळे यांना ३३ तर चव्हाण यांना ० मते मिळाली. सर्वाधिक मते घेतलेल्या सावंत यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले.

नूतन महापौर बोंद्रे व उपमहापौर सावंत यांचे पीठासीन अधिकारी खेमनार, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, माजी महापौर स्वाती यवलुजे, सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले. बोंद्रे यांचे पती पंडितराव, पुत्र इंद्रजित, युवा नेते ऋतुराज संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांनीही अभिनंदन केले.

विजयाचे शिल्पकार सतेज पाटील
बहुमतात असूनही गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांना विजयासाठी झगडावे लागले. शिवसेनेचे चार नगरसेवक काल-परवापर्यंत आघाडीसोबत होते; परंतु या निवडणुकीत मात्र त्यांनी अचानक उमेदवारी अर्ज भरून सर्वांनाच चक्रावून सोडले. सेनेने भाजप -ताराराणी आघाडी नेत्यांनाही आॅक्सिजनवर ठेवले. त्यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली होती. भाजपने स्थायी समिती सभापती निवडणुकीत घोडेबाजाराद्वारे दगाबाजी केल्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. आम्हाला मतदान करणार नाही ना तर मग विरोधी आघाडीकडेही जाऊ नये यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली. ती यशस्वी झाली. गुरुवारी रात्री शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसचा विजय सुकर झाला. या विजयाचे शिल्पकार आमदार सतेज पाटील हेच ठरले.

बोंद्रे, महापालिका आणि कोल्हापूर यांचा ऋणानुबंध
कोल्हापूरच्या राजकारणातील एक नामांकित घराणे म्हणून बोंद्रे घराण्याचा नावलौकिक आहे. माजी मंत्री कै. श्रीपतराव बोंद्रे यांनी राजकारण, सहकार, कृषीक्षेत्रात भरीव योगदान दिले तर कै. महिपतराव व कै. गजाननराव या दोन बंधूंनी त्यांना राजकारणात मोलाची मदत केली. त्यामुळेच बोंद्रे घराण्याचा एक इतिहास निर्माण झाला. नूतन महापौर शोभा या पंडितराव गजाननराव बोंद्रे यांच्या पत्नी होत. बोंद्रे घराण्याचा महापालिका आणि कोल्हापूरशी एक वेगळा ऋणानुबंध राहिला आहे. कै. श्रीपतराव बोंद्रे हे १९६२ मध्ये कोल्हापूरचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या कुशल मार्गदर्शनातून महानगरपालिकेचा परिवहन विभागाची (के.एम.टी.) स्थापना झाली. त्यांच्या घराण्यातील वारस असलेल्या शोभा बोंद्रे महापौर झाल्यामुळे या जुन्या ऋणानुबंधास उजाळा मिळाला. यापूर्वी कै. महिपतराव बोंद्रे यांची कन्या सई खराडे या सन २००५ मध्ये महापौर झाल्या होत्या. बोंद्रे घराण्यातील बाळासाहेब बोंद्रे व इंद्रजित बोंद्रे यांनाही यापूर्वी नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
 

या निवडणुकीत आम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. आघाडीचे सर्व नगरसेवक एकसंध राहिले हे आमचे मोठे यश आहे. शिवसेना गेल्या दोन वर्षांत ज्याप्रमाणे आमच्यासोबत एकत्र घेऊन राहिली, त्याचप्रमाणे त्यांनी भविष्यातही सोबत राहावे अशी आमची इच्छा आहे. शहराच्या विकासासाठी जे काही करता येईल ते सर्वांना विश्वासात घेऊन करू.
-सतेज पाटील, आमदार

महापौर निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीने घोडेबाजार केला नाही हे सकृतदर्शनी दिसते. आघाडीतील नगरसेवक फुटणार नाही याची मोठी पदाधिकाºयांनी खबरदारी घेतली. ‘स्थायी’त जो अनुभव आला तो यावेळी आला नाही. शहर विकासाची कामे तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नूतन पदाधिकारी प्राधान्य देतील.
-हसन मुश्रीफ, आमदार

अपूर्ण आणि प्रलंबित कामांना आपल्या कारकिर्दीत प्राधान्य देऊन त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले जातील. कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेला गती देण्याचा आपला प्रयत्न राहील. शहरात सध्या डेंग्यूसदृश रूग्ण आढळून येत आहेत. त्यासाठी शहरात विशेष मोहीम घेण्यासाठी अधिकाºयांना सांगितले जाईल. पावसाळा तोंडावर असल्याने नालेसफाईची कामेही गतीने करण्यास प्रशासनाला भाग पाडले जाईल.
-शोभा बोंद्रे, नूतन महापौर, कोल्हापूर महानगरपालिका.


कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे व उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर त्यांनी अशी विजयी खूण दाखवली.

Web Title:  Mayor of Congress: Kolhapur municipal corporation - Shobha Bondre elected The Deputy Mayor of NCP Mahesh Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.