कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरमंजिरी लाटकर यांची बहुमताने निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:48 AM2019-11-19T11:48:12+5:302019-11-19T14:08:44+5:30
मंगळवारी महापालिका सभेत झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटगे यांचा पराभव केला. लाटकर यांना ४३ तर शेटगे यांना ३२ मते पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी तटस्त राहण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर : महापौर-उपमहापौर पदासाठी आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या विशेष सभेत निवडणूक होत आहे. यात कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरमंजिरी लाटकर यांची बहुमताने निवड झाली. मंगळवारी महापालिका सभेत झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटगे यांचा पराभव केला. लाटकर यांना ४३ तर शेटगे यांना ३२ मते पडली.
या निवडणुकीत शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी तटस्त राहण्याचा निर्णय घेतला. तर काँग्रसचे आमदार चंद्रकात जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव व बंधू संभाजी जाधव यांनी भाजप ताराराणी आघाडीशी प्रामाणिक राहिले. तर तारारणीच्या तेजस्वीनी इंगवले या गैरहजर राहिल्या. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेची विशेष सभा होत आहे. या निवडणुकीची तयारी महापालिका नगरसचिव कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
महापालिका विद्यमान सभागृहाचे हे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीने महापौर निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादीला धक्का देण्याची तयारी केली होती. परंतु कॉँग्रेस-राष्टÑवादीमधील नाराजी दूर करण्यात तसेच लाटकरांच्या नावाला असलेला विरोध कमी करण्यात पक्षनेते आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यशस्वी झाल्यामुळे विरोधकांचे मनसुबे निवडणुकीपूर्वीच उधळले गेले.
महापौरपदाचे उमेदवार -
१. सूरमंजिरी लाटकर (राष्टÑवादी)
२. भाग्यश्री शेटके (भाजप)
उपमहापौरपदाचे उमेदवार -
१. संजय मोहिते (कॉँग्रेस)
२. कमलाकर भोपळे (ताराराणी)
सभागृहातील पक्षीय बलाबल
- कॉँग्रेस ३०, राष्टवादी १३, शिवसेना ४ = ४७
- भाजप १४, ताराराणी आघाडी १९ = ३३