महापौर, उपमहापौर निवड : पालकमंत्र्यांना धक्का; कोल्हापुरात चमत्कार घडलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:41 PM2018-12-10T12:41:23+5:302018-12-10T12:46:16+5:30
कोल्हापूर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी महापौरपदाच्या, तर काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ४१ मतांनी बाजी मारत विजय मिळविला.
कोल्हापूर : महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी महापौरपदाच्या, तर काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ४१ मतांनी बाजी मारत विजय मिळविला.
महापौर, उपमहापौरपद हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे कायम राखत आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धक्का दिला. त्यामुळे पालकमंत्र्यासह भाजप-ताराराणी आघाडीला अपेक्षित असणारा चमत्कार घडलाच नाही.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक गेल्या साडेतीन वर्षांत कधी नव्हे इतकी प्रतिष्ठेची करण्यात आली असून त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी ती वैयक्तिक पातळीवर घेतली.
गेल्या दोन दिवसांपासून या दोघांनी एकमेकांवर आरोप करून निवडणुकीतील चुरस स्पष्ट केली. अल्पमतात असलेल्या भाजप-ताराराणी आघाडीने सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का देत त्यांच्या नगरसेवकांची पदे रद्द करण्याचा डाव रचल्यामुळे या निवडणुकीने वेगळे वळण घेतले.
नगरसेवकांची पळवापळवी, त्यांची सौदेबाजी होणार हे अपरिहार्य होते. मात्र, शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करायला विलंब केल्याने रविवारी रात्रीपर्यंत तरी भाजपच्या हाती फारसे काही लागल्याचे चित्र नव्हते.
सोमवारी सकाळी सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ४१, तर भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके बलाबल राहिले. शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व कायम राहिले.