महापौर गवंडी यांच्यासह उपमहापौर शेटे यांचाही राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 01:29 PM2019-11-08T13:29:08+5:302019-11-08T13:30:42+5:30
कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या महापौर माधवी गवंडी यांनी आज, शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत आपला राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत उपमहापौर भूपाल ...
कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या महापौर माधवी गवंडी यांनी आज, शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत आपला राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत उपमहापौर भूपाल शेट्ये यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे दोन्ही राजीनामे सभेमध्ये मंजूर करण्यात आले आहेत.
महापालिकेतील सत्तापदे वाटपात ठरलेली मुदत संपल्यामुळे महापौरांना पक्षाने राजीनामा देण्यास सांगितले होते. लगेचच नवीन महापौर निवडणुकीच्या हालचाली वेग येणार आहे.
महानगरपालिकेत महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आणि कालावधी कमी अशी अवस्था झाल्यामुळे नेत्यांपुढेही दुसरा पर्याय राहिलेला नाही. गवंडी यांना केवळ चार महिने, तर सूरमंजिरी लाटकर यांना चार महिन्यांचा कालावधी देण्याचे ठरले होते.
दोन महिने पूर्ण होण्याआधीच विधानसभेची निवडणूक लागली आणि महापौरपदाची निवडणूक घेण्यावर निर्बंध आले; त्यामुळे गवंडी यांना दोन महिन्यांऐवजी चार महिने मुदत मिळाली.
महापौरपदाची निवडणूक घेण्यावरील राज्य सरकारचे निर्बंध उठल्यामुळे माधवी गवंडी यांनी आज, शुक्रवारी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत उपमहापौर भूपाल शेट््ये यांनीही राजीनामा दिला आहे.
त्यांच्या राजीनाम्यानंतर नवीन महापौर निवडीची तारीख विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निश्चित करून घेण्यात येईल; त्यासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे तारखेचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यानंतर नवीन महापौर निवडणुकीच्या हालचाली वेग येणार आहे.
राष्ट्रवादीकडून पुढील महापौरपदासाठी सूरमंजिरी लाटकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे, तर त्यांच्याविरोधात भाजप-ताराराणी आघाडीकडून स्मिता मारुती माने यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. माने यांचे नाव निश्चित झाले तर लाटकर यांच्याबरोबरची त्यांची लढत लक्षवेधी होईल. निवडणुकीत चांगलाच रंग भरला जाईल. सध्याच्या परिस्थितीत महापालिका सभागृहात कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत आहे.
लाटकर यांना किती महिने मिळणार ?
सूरमंजिरी लाटकर या महापौर होण्यात कसलीही अडचण नसली, तरी त्यांना या पदावर काम करण्याकरिता किती महिन्यांची संधी मिळणार हा विषय उत्सुकतेचा आहे. जर कमी कालावधी मिळाला तर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होणार आहे; त्यामुळे कॉँग्रेसच्या कोट्यातील दोन ते चार महिने त्यांना द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीकडून होण्याची शक्यता आहे.
मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी तर यापूर्वीच ठरल्याप्रमाणेच होईल, असा खुलासा केला आहे.