महापौर केसरी कुस्ती वादाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 10:46 PM2016-03-10T22:46:23+5:302016-03-10T23:45:36+5:30
कुस्तीगीर परिषदेचा आक्षेप : महापालिकेकडून दहा लाख मंजूर
सांगली : महापालिकेच्यावतीने पैलवान हरिनाना पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित महापौर केसरी कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या स्पर्धेच्या नामकरणातील केसरी या शब्दाला कुस्तीगीर परिषदेने आक्षेप घेतला आहे. राज्यात केवळ एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते. त्यामुळे पालिकेने केसरी शब्द वगळवा, अशी मागणी केली. दरम्यान, गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत या स्पर्धेसाठी दहा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला.
महापालिकेच्यावतीने १६ मार्च रोजी महापौर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सांगलीतील प्रसिद्ध मल्ल वज्रदेही हरिनाना पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या काही वर्षांपासून या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाच्या स्पर्धेसाठी पालिकेने दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे. काही सदस्यांनी केवळ कुस्तीलाच निधी का देता? असा सवाल करीत कबड्डी, खो-खो, फुटबॉलसाठी निधी देण्याची मागणी केली. हा वाद स्थायी समितीत रंगलेला असतानाच कुस्तीगीर परिषदेनेही स्पर्धेला आक्षेप घेतला आहे. परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी दुपारी महापौर हारुण शिकलगार यांची भेट घेऊन कुस्ती स्पर्धेबाबत नाराजी व्यक्त केली. या कुस्ती स्पर्धा महापौर केसरी म्हणून आयोजित करण्यात आल्या आहेत. केसरी हा शब्द केवळ महाराष्ट्र केसरीसाठी वापरला जातो. इतर स्पर्धांसाठी त्याचा वापर होत नाही. शिवाय महापालिकेने या स्पर्धासाठी कुस्तीगीर परिषदेची परवानगीही घेतलेली नाही. त्यांनी महापौर चषक कुस्ती स्पर्धा असे नामकरण केले असते, तर आमचा आक्षेप नव्हता.
महापौर शिकलगार यांनी याबाबत दक्षता घेण्याची ग्वाही मोहिते यांना दिली. सांगलीत अनेक नामांकित पैलवानांनी देश व राज्यातील कुस्ती मैदाने गाजविली आहेत. कुस्तीची परंपरा कायम ठेवण्यासाठी पालिका प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
नजरचुकीमुळे प्रकार
कुस्ती स्पर्धेच्या जाहिरातीमध्ये केसरी हा शब्द नजरचुकीने घातला आहे. या स्पर्धा हरिनाना पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महापौर यांच्या नावाने होत आहेत. त्यामुळे नामदेवराव मोहिते यांनी मोठा वाद करू नये. वास्तविक कुस्तीगीर परिषदेवर राजकीय वशिल्याने अनेकांची वर्णी लागली आहे. उलट कुस्तीगीर महासंघात हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी ज्येष्ठ पैलवानांचा समावेश आहे. त्यांनी महासंघावरही टीकाटिपणी करू नये, असे संयोजक नगरसेवक गौतम पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र केसरी वगळता इतर स्पर्धांमध्ये केसरी हा शब्द वापरता येत नाही. उद्या, कोणही उठेल आणि केसरी कुस्ती स्पर्धा घेईल. महापालिकेच्या स्पर्धेला आमचा विरोध नाही. त्यांनी अवश्य स्पर्धा घ्याव्यात. चषकाच्या नामकरणाची काळजी घ्यावी.
- नामदेवराव मोहिते, वरिष्ठ उपाध्यक्ष, कुस्तीगीर परिषद