महापौर, स्थायी सभापती राजीनामा देणार, शुक्रवारी सभा होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:06 PM2020-06-09T12:06:39+5:302020-06-09T12:08:09+5:30
महापौर निलोफर आजरेकर व स्थायी समिती सभापती संदीप कवाळे पदाचे राजीनामे देणार असून, त्याकरिता शुक्रवारी (दि. १२ जून) महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमहापौर संजय मोहिते यांचाही राजीनामा याचसोबत व्हावा म्हणून काहींनी प्रयत्न चालविले आहेत, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आजरेकर व कवाळे यांचे राजीनामे घेण्याचे निश्चित झाले असून, त्यांना तसे निरोपही देण्यात आले आहेत.
कोल्हापूर : महापौर निलोफर आजरेकर व स्थायी समिती सभापती संदीप कवाळे पदाचे राजीनामे देणार असून, त्याकरिता शुक्रवारी (दि. १२ जून) महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमहापौर संजय मोहिते यांचाही राजीनामा याचसोबत व्हावा म्हणून काहींनी प्रयत्न चालविले आहेत, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आजरेकर व कवाळे यांचे राजीनामे घेण्याचे निश्चित झाले असून, त्यांना तसे निरोपही देण्यात आले आहेत.
महापालिका सभागृहाची मुदत संपण्यास आता पाच महिने बाकी आहेत. शेवटच्या काही महिन्यांकरिता महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समिती पदावर वर्णी लागावी म्हणून अनेक इच्छुकांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडे गेल्या काही महिन्यांपासून आग्रह धरला आहे. त्यामुळे आजरेकर, मोहिते व कवाळे यांना निरोप मिळताच राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते.
लॉकडाऊन संपला असून, आता दैनंदिन व्यवहारसुध्दा सुरळीत होत आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौर व स्थायी सभापती यांनी राजीनामे द्यावेत यासाठी तगादा लावला गेला होता. राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी कवाळे यांनी राजीनामा देण्याचा निरोप शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यामार्फत दिला. तो त्यांच्यापर्यंत पोहोचला असून, त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.
त्यानंतर आर. के. पोवार, राजू लाटकर यांनी कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांची भेट घेऊन त्यांनाही ही माहिती दिली. त्यानंतर कॉंग्रेस गोटातही महापौर आजरेकर यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना राजीनामा देण्याचा निरोप देशमुख यांच्यामार्फत पाठविला.
राजीनामा कधी द्यावा यावरही सोमवारी दोन्ही कॉंग्रेसमध्ये चर्चा सुरू होती. येत्या शुक्रवारी महापालिकेची सभा बोलविण्याची सूचना पुढे आली, परंतु त्यावर सोमवारी उशिरापर्यंत निर्णय झालेला नव्हता.
निवडणूक घेण्यास अडचण नाही
लॉकडाऊन पूर्णत: उठविला नाही. त्यामुळे राजीनामा दिला तरी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी घेता येतील का याची माहिती नगरविकास विभागाकडून घेतली असून, निवडणूृक घेण्यात तशी कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्टीकरण मिळाले आहे. त्यामुळेच राजीनाम्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
केशवराव भोसले नाट्यगृहात होणार सभा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर ठेवणे आवश्यक असल्यामुळे महापालिकेतील सभागृहाऐवजी केशवराव भोसले नाट्यगृहात ही सभा आयोजित करण्याचा पर्याय समोर आला आहे. महापौर आजरेकर यांनी सभा आयोजित करण्यासंबंधीचे पत्र नगर सचिव सुनील बिद्रे यांना सोमवारी दिले, परंतु गटनेते शारंगधर देशमुख यांना विचारून तारीख निश्चित करा, असे त्यांना सांगितले आहे. सभेत यावर्षीचे अंदाजपत्रक मांडले जाणार आहे.
दीपा मगदूम, चव्हाण, बनछोडे आघाडीवर
महापौर पद आपणास मिळावे म्हणून दीपा मगदूम, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे या इच्छुक आहेत. त्यांनी नेत्यांकडे आग्रह धरला आहे. कोल्हापूर उत्तरनंतर दक्षिणला महापौर पद देण्याचा निर्णय झाला, तर मगदूम यांच्या गळ्यात ही माळ पडेल आणि पतीनंतर पत्नीने महापौर होण्याचे भाग्य त्यांच्या पदरात पडेल, पण चव्हाण यांनीही मोठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे या सभागृहातील शेवटचे महापौर पद कोणाला मिळते याकडे लक्ष लागले आहे. स्थायी समिती पद सचिन पाटील यांना देण्याचे आधीच ठरले आहे.