महापौर भाजपचाच होईल
By admin | Published: November 4, 2015 12:46 AM2015-11-04T00:46:28+5:302015-11-05T00:09:51+5:30
चंद्रकांतदादा पाटील : जल्लोषाची तयारी करा, चमत्कार शक्य
कोल्हापूर : राजकारणात चमत्कार घडत असतात. त्यामुळे १६ तारखेला कोल्हापूरचा महापौर भाजपचाच होईल. दोन दिवसांत ‘गुड न्यूज’ देतो. विजयी मिरवणुकीच्या तयारी लागा, असा गौैप्यस्फोट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. मंगळवारी येथील ताराराणी चौकातील हॉटेलमध्ये भाजप-ताराराणी आघाडीच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा करून खळबळ उडवून दिली.
सत्तेपासून दूर राहिलो असलो तरी आम्ही प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून काम करू, असे सोमवारी निकालानंतर सांगणाऱ्या पालकमंत्री पाटील यांनी २४ तासांच्या आतच घुमजाव करत महापौरपदाच्या स्पर्धेत आपणही असल्याचे जाहीर केले. भाजप-ताराराणी आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार व पराभूतांना प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम झाला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरचा महापौर भाजपचाच होईल. त्यासाठी करवीरनिवासिनी अंबाबाईला साकडे घातले आहे. तसेच माझ्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उद्या मुंबईला आणि परवा दिल्लीला जाणार आहे.’
मेळाव्यात पाटील म्हणाले, ‘आपल्याला स्वच्छ कारभार करावयाचा आहे. विजयी उमेदवारांनी आपल्या प्रभागात २५ वर्षे भाजप-ताराराणीची सत्ता राहिली, यासाठी कामाचे नियोजन करावे. त्यांनी मनपाची एकही बैठक चुकविता कामा नये. स्थायी समिती, अन्य कोणत्याही निवडणुकीवेळी गैरहजर राहू नये; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू. पराभूतांना नगरसेवकाइतकाच सन्मान देऊ. यावेळी सुभाष रामुगडे, ताराराणी आघाडीचे स्वरूप महाडिक, सुनील मोदी, सुनील कदम, आदींसह विजयी, पराभूत उमेदवार उपस्थित होते.
‘कारभाऱ्यां’विरोधात नाईकनवरे यांची तक्रार
या मेळाव्यात व्हीनस कॉर्नर प्रभागातून पराभूत झालेले प्रकाश नाईकनवरे यांनी मला पाडण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीतील काही कारभाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून फिल्डिंग लावली होती. त्यामुळे काही मोजक्या मतांनी माझा पराभव झाला. मी निवडून आलो असतो तर, भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळ वाढले असते. मला पाडण्यासाठी कारणीभूत कारभाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.
पराभूत उमेदवारांचा सन्मान राखणार
भाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेतही भाजप-ताराराणी आघाडीची सत्ता येईल. त्यादृष्टीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याचे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, भाजप-ताराराणी आघाडीकडून लढलेल्या; पण पराभूत झालेल्या उमेदवारांचा सन्मान राखला जाईल. त्यांना ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ तसेच विविध महामंडळे, समितींवरील पदे दिली जातील.