महापौरांचा जामीन फेटाळला
By Admin | Published: February 5, 2015 12:23 AM2015-02-05T00:23:31+5:302015-02-05T00:29:39+5:30
लाच प्रकरण : आज स्वत:हून पोलिसांत हजर राहणार
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष जिल्हा न्यायाधीश के. डी. बोचे यांनी फेटाळला. त्यामुळे महापौर माळवी यांना आज, गुरुवारी अटक करण्याची तयारी लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी केली आहे; परंतु माळवी ह्या स्वत:हून रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर राहणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. महापौर माळवी यांचा खासगी स्वीय सहायक अश्विन गडकरी हा कार्यकर्त्यांसह न्यायालयाच्या आवारात दुपारी दोनपासून उभा होता. दुपारी तीनच्या सुमारास न्यायाधीश बोचे यांनी माळवी यांचा चौकशी जबाब अद्याप अपुरा आहे. त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डिंगची (आवाजाची) तपासणी अद्याप झालेली नाही. तपासाच्या दृष्टीने ती घेणे आवश्यक आहे. या संपूर्ण घटनेमध्ये महापौर माळवी यांना अटक होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचा जामीन नामंजूर केल्याचे सांगितले. दरम्यान, जामीन फेटाळल्याचे समजताच लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी माळवी ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तेथील डॉक्टरांशी फोनवरून चर्चा केली. माळवी यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी अर्धा तास पोलिसांना कळविण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालयास दिल्या. त्यामुळे त्या रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. शिवाजी पेठेतील पर्यायी जागा देण्यासाठी तक्रारदार संतोष हिंदुराव पाटील यांच्याकडून १६ हजारांची लाच स्वीकारल्याच्या संशयावरून महापौर तृप्ती अवधूत माळवी व त्यांचा खासगी स्वीय सहायक अश्विन मधुकर गडकरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३० जानेवारीला रंगेहात पकडले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महिलांना सायंकाळनंतर अटक करता येत नसल्याने माळवी यांना जाबजबाब घेऊन रात्री घरी जाऊ दिले होते; तर स्वीय सहायक गडकरी याला अटक केली होती. दुसऱ्या दिवशी अटक होण्याच्या भीतीने महापौर माळवी या रक्तदाब वाढल्याचे कारण पुढे करून शनिवारी (दि. ३१) सकाळी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांचे वकील प्रशांत देसाई यांनी २ फेब्रुवारी रोजी अटकपूर्व जामीन मंजुरीचा अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश बोचे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासी अधिकारी पद्मा कदम यांनी जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांच्यातर्फे चौकशी अहवाल मंगळवारी (दि. ३) न्यायालयात सादर केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायाधीश बोचे यांनी अंतिम निर्णय बुधवारी दिला जाईल, असे सांगितले. त्यानुसार दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी जामीन नामंजूर केल्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)
महापौर माळवी यांना डिस्चार्ज मिळताच अटक करून त्यांना चौकशीसाठी कार्यालयात आणले जाईल. या ठिकाणी त्यांच्या आवाजाची चाचणी घेऊन न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी त्यांना पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती न्यायालयास केली जाईल. आता फक्त त्यांच्या डिस्चार्जची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. - पद्मा कदम, पोलीस उपअधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
महापौर माळवी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याबाबत उच्च न्यायालयात अपील करणार नाही. त्यांची प्रकृती स्थिर असल्यास त्या गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन स्वत:हून लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर राहून तपासासाठी पोलिसांना सहकार्य करतील.
- अॅड. प्रशांत देसाई, महापौरांचे वकील
या मुद्द्यांवर फेटाळला अर्ज
महापौर माळवी ह्या प्रतिष्ठित व जबाबदार व्यक्ती असल्या तरी त्यांनी केलेला गुन्हा हा गंभीर आहे.
कायद्यासमोर सर्वांना समान न्याय आहे.
चौकशी जबाब अद्याप अपुरा आहे. त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डिंगची (आवाजाची) तपासणी अद्याप झालेली नाही.
जामीन मिळाल्यास त्या साक्षीदारावर दबाब टाकू शकतात. तसेच त्याचा साक्षीदारावर परिणाम होऊ शकतो.
तक्रारदार संतोष पाटील यांना माळवी समर्थक धमकी देत असल्याने त्यांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो.