महापौर चषक फुटबॉल स्पर्धा ; ‘खंडोबा’ला नमवून फुलेवाडी उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 05:13 PM2020-03-12T17:13:54+5:302020-03-12T17:18:09+5:30
चुरशीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ चा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सजग गोलरक्षणामुळे फुलेवाडीच्या जिगर राठोडला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
कोल्हापूर : चुरशीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ चा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सजग गोलरक्षणामुळे फुलेवाडीच्या जिगर राठोडला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत फुलेवाडी व खंडोबा तालीम मंडळ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतील सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी चेंडू एकमेकांच्या गोलक्षेत्रात फिरता ठेवला.
खंडोबाकडून कपिल शिंदे, माणिक पाटील, अजिज मोमीन, प्रभु पोवार, विकास बहारे यांनी तर फुलेवाडीकडून अभिषेक देसाई, निलेश खापरे, संकेत वेसणेकर, रिचर्ड, रोहीत मंडलिक, अरबाज पेंढारी यांनी लक्षवेधी खेळाचे प्रदर्शन केले. दोन्ही संघांच्या दमदार खेळीमुळे सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात खंडोबा संघाने आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन करण्यास सुरूवात केली. त्याचाच फायदा ५५ व्या मिनिटाला कपिल शिंदेने उठवित गोल केला. त्यामुळे खंडोबा संघास १-० अशी आघाडी मिळाली. या आघाडीनंतर फुलेवाडी संघाकडून वेगवान व शॉर्ट पासिंगचा अवलंब करण्यात आला. या दरम्यान खंडोबा संघाचा मोठ्या गोलक्षेत्राबाहेर मिळालेल्या फ्री कीकवर डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या गोलची नोंद फुलेवाडीच्या रिचर्डने केला.
हा गोलचा फटका इतका वेगवान होता की गोलरक्षकाला हा चेंडू गोलजाळ्यात कधी शिरला हे कळालेच नाही. त्यामुळे सामना १-१ असा बरोबरीत आला. अखेरीस सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्यात आला. त्यात फुलेवाडीकडून अरबाज पेंढारी, रिचर्ड, रोहित मंडलिक यांनी, तर खंडोबाकडून केवळ निखिल जाधव यास गोल करण्यात यश आले. त्यामुळे हा सामना फुलेवाडी संघाने ३-१ असा जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.