महापौरांची सुनावणी पाच मिनिटांत पूर्ण
By admin | Published: June 11, 2015 01:02 AM2015-06-11T01:02:14+5:302015-06-11T01:06:50+5:30
लाच प्रकरण : निर्णय राखीव; उच्च न्यायालयात जाण्याची तयारी
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांच्या लाचखोरीच्या प्रकरणावरून नगरसेवकपद रद्द करण्याबाबत बुधवारी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. महापौर तृप्ती माळवी, आयुक्त पी. शिवशंकर व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक पद्मा कदम यांनी बाजू मांडली. मंत्री डॉ. पाटील यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत सुनावणी पूर्ण झाल्याचे जाहीर केले. मात्र, या प्रकरणी निर्णय राखीव ठेवला. निर्णय कधी जाहीर होणार, हे स्पष्ट नसले तरी महापौरांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, मंत्री पाटील यांनी अवघ्या पाच मिनिटांत सुनावणी आटोपली.
स्वीय सहायकामार्फत १६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ३० जानेवारीला महापौर तृप्ती माळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. अटकेच्या नामुष्कीनंतरही महापौर माळवी यांनी पदावरून पायउतार होण्यास नकार दिला. त्यामुळे महापौरांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस सभागृहाने ठरावाद्वारे केली. त्याबाबत राज्यमंत्र्यांसमोर सुनावणी पूर्ण झाली.
मंत्री पाटील यांनी सर्वांत प्रथम आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडून माहिती घेतली. महापौर माळवी यांनी, या प्रकरणी न्यायालयाने आपणास दोषी ठरविलेले नाही. त्यामुळे कारवाई करणे उचित नाही, असे स्पष्ट केले. म्हणणे ऐकून घेऊन डॉ. पाटील यांनी लवकरच सुनावणीचा निकाल जाहीर होईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
५राज्यमंत्र्यांकडे महापौर लाचप्रकरणी सुनावणी होणार असल्याने प्रशासनासह नगरसेवकांत उत्सुकता होती. प्रशासनातर्फे आयुक्त पी. शिवशंकर हजर होते. मात्र, राज्यमंत्र्यांच्या दालनात फक्त पाच मिनिटांत सुनावणी आटोपली.