महापौरांची अ‘तृप्ती’!

By Admin | Published: February 10, 2015 12:43 AM2015-02-10T00:43:39+5:302015-02-10T00:43:51+5:30

माळवींचा राजीनामा नाहीच : नेत्यांचे आदेश धुडकावले

Mayor's 'outrage'! | महापौरांची अ‘तृप्ती’!

महापौरांची अ‘तृप्ती’!

googlenewsNext

कोल्हापूर : लाचप्रकरणात रंगेहात पकडलेल्या कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर तृप्ती माळवी यांनी सोमवारी महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी राजीनामा मंजुरीसाठी सादरच होऊ दिला नाही. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपणार आहे. दरम्यान, लाचखोरी प्रकरणात मुद्दाम अडकविल्याने राजीनामा देण्याची मानसिकता नाही. मात्र, १६ फेब्रुवारीला होणाऱ्या सभेत राजीनामा देऊ, असे महापौर माळवी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.महापालिकेने १९५४ मध्ये संपादित केलेली परंतु वापर न केलेली जागा परत देण्यासाठी गेल्या ३० जानेवारीला १६ हजारांची लाच घेताना महापौर माळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर या प्रकरणी गुरुवारी (दि. ५) त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांची ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. ज्या दिवशी त्यांना लाच घेताना पकडण्यात आले. त्या दिवशी पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता. महानगरपालिकेची सोमवारी सर्वसाधारण सभा बोलाविण्याचा लगेच निर्णय झाला होता. (पान ८ वर)


जिल्हा परिषदेच्या राजकारणातील काढले उट्टे
माळवी यांच्या राजीनाम्यानंतर माजी
गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाच्या काँग्रेस महिला सदस्यांना महापौरपदाची संधी मिळणार होती परंतु माळवींनी राजीनामा न दिल्याने काँग्रेसमधील इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरणार आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी माळवी महापौरपदाचा राजीनामा देतील, असे जाहीर केले होते परंतु राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी माळवी यांना तुम्ही राजीनामा देऊ नका, पुढे काय करायचे ते आपण बघू, असे अभय दिल्याने माळवी यांनी राजीनामा दिला नसल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरू होती.


जिल्हा परिषदेच्या राजकारणात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांचा चुलतभाऊ अमल महाडिक यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळू नये म्हणून तत्कालीन अध्यक्ष संजय मंडलिक यांचा राजीनामा लांबविला होता.
महापौर माळवी यांच्या राजीनाम्यानंतर सतेज पाटील गटाच्या नगरसेविकेला महापौरपदाची संधी मिळणार होती. ती मिळू नये म्हणून महाडिक गटाने जिल्हा परिषदेच्या राजकारणातील उट्टे महापालिकेच्या राजकारणात काढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वर्चस्वाचा वादही उफाळून येण्याची चिन्हे आहेत. सध्या महापालिकेतील राष्ट्रवादीच्या सत्तारुढ गटाचे नेतृत्व मुश्रीफ करतात.
येत्या सहा महिन्यांत महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यावेळी महाडिक गट ताराराणी आघाडी रिंगणात आणण्याचा तयारीत आहे. महाडिक यांनी माळवींना पाठिंबा देण्यामागे हे देखील राजकारण आकारास येत असावे, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

राजीनामा १६ फेब्रुवारीला
लाचखोरी प्रकरणात जाणीवपूर्वक अडकविण्यात आले आहे. शहराच्या महापौरपदावरच हा घाला आहे. या रचलेल्या षङ्यंत्रात मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले आहे. मानसिकता नसल्यानेच सोमवारच्या सभेत राजीनामा दिला नाही. १६ फेब्रुवारीच्या महापालिका सभेत राजीनामा देणार आहे. - तृप्ती माळवी, महापौर

काँग्रेस गोटात अस्वस्थता
महापौरांवर अविश्वास ठराव आणण्याची महापालिका कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे आता नव्याने विशेष सभा बोलावेपर्यंत नेत्यांना व सदस्यांनाही काहीच करता येणार नाही. महापौर माळवी राजीनामा न देण्यावर ठाम राहिल्यास १५ नोव्हेंबर २०१५पर्यंत त्यांना या पदावरून कोणीही हटवू शकणार नाही. त्यामुळे विशेषत: महापौरपदाची संधी असलेल्या काँग्रेस गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

मुश्रीफांनी ‘शब्द’ पाळावा
काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीनेही आता ‘आघाडी धर्म’ पाळावा. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी सांगूनही महापौरांनी राजीनामा दिला नाही. मात्र, मुश्रीफ यांनी आघाडी करताना दिलेला ‘शब्द’ पाळावा. लवकरच सभा घेऊन महापौरांना राजीनामा देण्यास सांगावे.
- सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री

Web Title: Mayor's 'outrage'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.