महापौरप्रश्नी स्थगिती याचिका सोमवारी
By admin | Published: June 20, 2015 12:04 AM2015-06-20T00:04:29+5:302015-06-20T00:35:15+5:30
मुंबईतील पावसाचा परिणाम : इच्छुक व माळवी समर्थकांची घालमेल
कोल्हापूर : लाचखोर प्रकरणावरून नगरसेवकपद रद्द झालेल्या माजी महापौर तृप्ती माळवी यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. माळवी यांनी दाखल करणाऱ्या संभावित याचिकेवर महापालिका किंवा राज्य शासनास विचारात घेतल्याखेरीज एकतर्फी निर्णय देऊ नये, असे ‘कॅव्हेट’ दाखल केले जाणार आहे. मुंबईत शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे न्यायालयाचे कामकाम बंद असल्याने माळवी व सत्ताधारी आघाडी सोमवारी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. या घडमोडींमुळे महापौरपदी इच्छुकांसह माळवी समर्थकांची घालमेल सुरू आहे.
नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तृप्ती माळवी यांचे लाचखोरीमुळे नगरसेवक पद व त्या अनुषंगाने महापौरपद रद्द केल्याचे गुरुवारी जाहीर केले. त्यानंतर तत्काळ तृप्ती माळवी यांना महापौर म्हणून मिळणाऱ्या सर्व सेवा खंडित करण्यात आल्या. माळवी पदावरून पायउतार होताच महापालिकेतील घडामोडी वेगावल्या आहेत. माळवी समर्थकांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. शुक्रवारी झालेल्या सभेतही माळवीसमर्थक शांत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर सचिन खेडकर यांना भूषविण्याचा मान मिळाला.
माळवीप्रकरणी प्रशासनाने स्पष्ट कारवाई करावी. महापौर निवडीबाबत विभागीय आयुक्तांना लिहावे. याप्रकरणी तत्काळ कॅव्हेट दाखल करावे, या प्रकरणी हयगय झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा दम गटनेता शारंगधर देशमुख, राजेश लाटकर व जयंत पाटील यांनी सभेत दिला. दरम्यान, मुंबईतील जोरदार पावसामुळे सोमवारी माळवी यांच्यातर्फे याचिका तर राष्ट्रवादी तसेच महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले जाणार आहे.