महापौरपदाची मोर्चेबांधणी सुरू. सरिता मोरे यांचा राजीनामा : निवडणुकीत भरणार रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 02:42 PM2019-06-20T14:42:15+5:302019-06-20T14:44:05+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या आदेशाचा सन्मान करीत अपेक्षेप्रमाणे सरिता मोरे यांनी बुधवारी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन महापौर निवडीची मोर्चेबांधणी सुरू झाली. नुकत्याच झालेल्या लोकसभेचा निवडणुकीचा निकाल, महापालिकेची दोन प्रभागांतील पोटनिवडणूक, भाजप- शिवसेना यांची राज्यात झालेली युती या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत येणार आहे.
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या आदेशाचा सन्मान करीत अपेक्षेप्रमाणे सरिता मोरे यांनी बुधवारी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन महापौर निवडीची मोर्चेबांधणी सुरू झाली. नुकत्याच झालेल्या लोकसभेचा निवडणुकीचा निकाल, महापालिकेची दोन प्रभागांतील पोटनिवडणूक, भाजप- शिवसेना यांची राज्यात झालेली युती या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत येणार आहे.
महापालिकेतील राजकीय सत्तेच्या वाटणीत एक वर्षाकरिता महापौरपद राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे आहे. महापौरपदाकरिता इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे सहा-सहा महिने दोघा इच्छुकांना संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला होता. त्यांपैकी सहा महिन्यांच्या मुदतीकरिता सरिता मोरे यांना महापौर करण्यात आले होते. त्यांची मुदत संपल्यामुळे त्यांनी बुधवारी महासभेत राजीनामा दिला. आता पुढील सहा महिन्यांकरिता अॅड. सूरमंजिरी राजेश लाटकर व माधवी प्रकाश गवंडी यांच्यापैकी एकीला संधी मिळण्याची शक्यता आहे.
मोरे महापौरपदाचा राजीनामा देतील की नाही याबाबत शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यामुळे इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु आमदार हसन मुश्रीफ यांनी शहराध्यक्ष आर. के. पोवार व ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्याकरवी निरोप देऊन त्यांचा राजीनामा घेणे भाग पाडले. महापौर मोरे, त्यांचे पती नंदकुमार मोरे यांच्याशीही याबाबत चर्चा झाली होती. मोरे यांनी नेत्यांच्या आदेशाचा सन्मान राखत अखेर राजीनामा दिला. महासभेत त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी गेल्या सहा महिन्यांत केलेल्या कामांचा आढावा घेऊन सर्वांचे आभार मानले.
विरोधी आघाडीकडून स्मिता माने?
मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन महापौर निवडीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडी सुरू झाल्या. सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून सूरमंजिरी लाटकर आणि माधवी प्रकाश गवंडी या इच्छुक आहेत. दोघींनाही खूप अपेक्षा आहेत. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडून मात्र सावध पवित्रा घेतला जात आहे. नेते सांगतील त्याप्रमाणे आमचा उमेदवार ठरविला जाईल; तसेच व्यूहरचना आखली जाईल, असे या आघाडीकडून सांगण्यात आले. मात्र ताराराणी आघाडीच्या स्मिता मारुती माने यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे.
‘राष्ट्रवादी’कडून सूरमंजिरी लाटकरना संधी
राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अॅड. सूरमंजिरी लाटकर यांना महापौरपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. सरिता मोरे व लाटकर यांच्यात सहा महिन्यांपूर्वी जेव्हा चढाओढ झाली तेव्हा मोरे यांना पहिले सहा महिने आणि त्यानंतर लाटकर यांना संधी देण्याचे ठरले होते. ज्याप्रमाणे मोरे यांनी नेत्यांचा मान राखून राजीनामा दिला, त्याप्रमाणे नेते दिलेल्या शब्दाप्रमाणे लाटकर यांना महापौर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाटकर या वकील असून उच्च विद्याविभूषित महिला महापौरपदावर विराजमान होणे हा करवीरवासीयांच्या दृष्टीने भूषणावह ठरणार आहे.
भाजप कुरापती करणार?
सध्या राज्यात तसेच देशात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे भाजप महापौरपदाच्या निवडणुकीत काही कुरापती करण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे राष्टÑवादीच्या नगरसेवकांवर कारवाई करून त्यांचे नगरसेवकपद रद्द केले, त्याप्रमाणे आणखी काही नगरसेवकांवर कारवाई होते का, हा उत्सुकतेचा विषय आहे. दोन्ही कॉँग्रेसचे पाच नगरसेवक जातीच्या वैधतेत सापडले असून, दोन नगरसेवक अवैध बांधकामांच्या निमित्ताने अडचणीत आहेत. शिवाय दोन प्रभागांतील पोटनिवडणुकीचा निकाल काय लागतो हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्याचे संख्याबळ
कॉँग्रेस - २९
राष्टÑवादी - १३
ताराराणी - १९
भाजप - १४
शिवसेना - ४
----------------------
- भारत