मयूरवाहिनी, शैलपुत्री, त्रिपूरसुंदरी
By admin | Published: September 29, 2016 12:16 AM2016-09-29T00:16:11+5:302016-09-29T00:33:34+5:30
नवरात्रौत्सवात अंबाबाईची रूपे : पूजेतून पुराणकाळाची अनुभूती मिळणार
कोल्हापूर : आदिशक्ती महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असलेली करवीरनिवासिनी अंबाबाई यंदाच्या नवरात्रौत्सवात मयूरवाहिनी, शैलपुत्री, त्रिपूरसुंदरी, गायत्रीदेवी अशा दुर्गेच्या विविध रूपांत दिसणार आहे. जुन्या जाणत्या श्रीपूजकांकडून १९८० ते ९० च्या दशकात अशा प्रकारच्या पूजा बांधण्यात आल्या होत्या.
नवरात्रौत्सवातील दिवसात करवीरनिवासिनी अंबाबाईची रोज एका दुर्गेच्या रूपात पूजा बांधली जाते. जडावाच्या अलंकारांनी बांधल्या जाणाऱ्या या पूजा देशभरातील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या पूजा बांधण्यासाठी नवरात्रौत्सवात वार आलेल्या श्रीपूजकांना सहा महिने आधीपासून तयारी करावी लागते. या पूजा बांधणे ही देखील एक कला आहे, जी गेल्या ५६ पिढ्यांपासून श्रीपूजकांनी साधली आहे. यंदाच्या नवरात्रातील पहिले पाच दिवस दिवाकर ठाणेकर यांचा वार आहे. पुढील सहा दिवस संजय मुनिश्वर यांच्याकडे आले आहे. दोन्ही श्रीपूजकांच्यावतीने यंदा १९८० ते ९० च्या दशकातील पूजा बांधण्यात येणार आहेत. गेल्या पाच वर्षांत पुराण कथेतील एक विशिष्ट थीम घेऊन किंवा भारतासह अन्य देशांत असलेल्या शक्तिपीठांच्या इतिहासावर आधारित पूजा बांधल्या जात आहे. मात्र, पूर्वी ही सोय नव्हती. त्यामुळे उपलब्ध पौराणिक ग्रंथांमधील कथांनुरूप पूजा बांधल्या जात होत्या. त्या काळातील पूजांची अनुभूती यंदा भक्तांना मिळणार आहे. यंदा नवरात्रौत्सव ११ दिवसांचा आहे. हे दिवस आणि बांधल्या जाणाऱ्या पूजांचे वैशिष्ट्य खास वाचकांसाठी..
उत्सवकाळातील देवीच्या पूजांचे विस्तृत नियोजन
शुक्रवार (दि.३०) : जडावाच्या दागिन्यांची खडी पूजा.
शनिवार (दि.१ आॅक्टोबर) : सिंहासनारूढ अंबाबाई : हा घटस्थापनेचा दिवस. या दिवशी देवी भक्तांच्या उपासना स्वीकारत सिंहासनावर विराजमान होते आणि भक्तांना आशीर्वाद देते. घटस्थापनेच्या विधीला ‘देवी बसली’, असे संबोधले जाते.
रविवार (दि. २) मयूरवाहिनी : नवशक्ती देवतांमधील एकशक्ती देवता.
सोमवार (दि. ३) शैलपूत्री पूजा : नवदुर्गामधील व नवरात्रामधील प्रथम देवता.
मंगळवार (दि. ४): सिंहवाहिनी : महाभयांचा नाश करणारी व भक्तांचे रक्षण करणारी देवता
बुधवार (दि. ५) : गरूडवाहिनी : कोल्लासूर दैत्यास भय निर्माण करणारी देवी.
गुरुवार (दि. ६) : गजारूढ : यादिवशी अंबाबाई लव्याजम्यानिशी आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीस जाते.
शुक्रवार (दि. ७) : महात्रिपूरसुंदरी : दशमहा विद्येतील लोकप्रिय देवी.
शनिवार (दि. ८) : बालात्रिपूरसुंदरी : विद्या उपासना देवी, महात्रिपूरसुंदरी देवीचे कुमारी स्वरूप.
रविवार (दि. ९) महिषासूरमर्दिनी : महिषासूर दैत्याचा नाश करणारी पारंपरिक पूजा.
सोमवार (दि. १०) : गायत्रीदेवी : शक्ती उपासना देवी
मंगळवार (दि.११) रथामधील पूजा : सीमोल्लंघनासाठी निघालेली देवी.