‘एम.डी.’विनाच कारखान्याचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:47 AM2017-08-29T00:47:16+5:302017-08-29T00:49:21+5:30
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सह. साखर कारखान्यात संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे संचालक नाहीत, तर जानेवारीतील एम.डी.चा मुदतवाढ प्रस्ताव वेळेत मंजूर न झाल्याने दीड महिना कारखाना एम.डी.विनाच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सह. साखर कारखान्यात संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे संचालक नाहीत, तर जानेवारीतील एम.डी.चा मुदतवाढ प्रस्ताव वेळेत मंजूर न झाल्याने दीड महिना कारखाना एम.डी.विनाच आहे. ‘चूक एकाची दंड दुसºयाला’ असे झाले असून, निवडणूक धामधुमीत कर्मचाºयांची धांदल उडत आहे.
बिद्री साखर कारखान्याच्या वाढीव सभासदांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात होता. त्याच दरम्यान विरोधक आमदार प्रकाशराव आबिटकर, दिनकरराव जाधव, आदी मंडळींनी संचालक मंडळाची मुदत संपल्याने ते बरखास्त करावे, अशी मागणी केली. डिसेंबर २०१५ ला संचालक मंडळ बरखास्त झाले. प्रशासकीय कार्यभार सुरू झाला, तर रेंगाळलेली सभासद छाननीही नुकतीच पूर्ण झाली असून, निवडणुकीची धामधूम सुरू झाली. एकीकडे कारखाना कार्यक्षेत्रात चार तालुक्यांतील राजकीय वातावरण तापू लागले, तर दुसरीकडे कारखान्याकडून सहसंचालक कार्यालयात कागदपत्रांची देवाण-घेवाण वाढली आणि एम.डी.यांचे कारखान्यात येणे बंद झाले.
१९ जानेवारी २०१७ ला कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. देसाई सेवानिवृत्त होत होते. त्याचवेळी ३१ जानेवारीला प्रशासकीय मंडळाच्या मिंटिगमध्ये एम.डीं.ना मुदतवाढीचा प्रस्ताव केला. त्यानंतर परत १६ जून २०१७ ला तीन महिन्यांचा वाढीव प्रस्ताव पाठविला. मात्र, प्रस्ताव सहकार विभागाकडे वेळेत न मिळाल्याने त्या विभागाने २३ जून २०१७ ला एम.डीं.ना सेवानिवृत्तीनंतर कारभार केल्याने पगार वसूल करून घेण्यासाठी नोटीस पाठविली.
ही नोटीस मिळाल्यापासून कारखान्यात एम.डीं.नी येणे बंद केले. त्यामुळे गेले दीड महिना कारखान्याचा कारभार एम.डीं.विनाच आहे. सध्या कार्यकारी संचालकपदाचा कार्यभार कारखान्याचे सचिव एस. जी. किल्लेदार पाहत आहेत.
प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातून एम.डीं.चा मुदतवाढ प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठविण्यास विलंब झाला. मात्र, याबाबत संबंधित विभागावर कोणतीच कार्यवाही न करता कारखान्याच्या एम.डीं.ना नोटीस पाठविणे म्हणजे ‘चूक एकाची आणि दंड दुसºयाला’ अशी अवस्था झाली आहे.
हमिदवाड्यात एक, बिद्रीत दुसरेच
कारखाना कार्यकारी संचालकपदावर नेमणूक व्हावी, यासाठी शासनाने यापूर्वी घेतलेल्या परीक्षेत जिल्ह्यातील हमिदवाडा साखर कारखान्याचे एन. एस. पाटील व बिद्री साखर कारखान्याचे धनंजय देसाई हे दोघे उत्तीर्ण झाले.
त्यापैकी पाटील यांची हमिदवाड्याच्या एम.डी.पदी नियुक्ती झाली. मात्र, बिद्रीत पॅनेलवरील उमेदवार डावलून प्रभारी उमेदवार देण्यासाठी लॉबिंग झाल्याची चर्चा आहे. कोणत्याही राजकीय गटाची सता नसताना व कारखान्याची सूत्रे कर्तृत्वदक्ष अधिकारी पाहत आहेत, तरीही पॅनेलवरील उमेदवार डावलून प्रभारीची चर्चा रंगली आहे. या दोन वर्षांत अन्य पदांवर जाहिरात काढून भरती करण्यात आली. मात्र, एम.डीं.बाबत कुठे घोडे अडले ? याची चर्चा आहे.