Kolhapur: राजाराम कारखान्याच्या एमडींना मारहाण; डॉ. संदीप नेजदार यांच्यासह ८ जण अटकेत

By उद्धव गोडसे | Published: January 3, 2024 01:02 PM2024-01-03T13:02:08+5:302024-01-03T13:03:03+5:30

निवडणूक वादातून मारहाण झाल्याची फिर्याद

MD of Rajaram factory beaten up; Crime against 13 persons including Sandeep Nejdar in kolhapur | Kolhapur: राजाराम कारखान्याच्या एमडींना मारहाण; डॉ. संदीप नेजदार यांच्यासह ८ जण अटकेत

Kolhapur: राजाराम कारखान्याच्या एमडींना मारहाण; डॉ. संदीप नेजदार यांच्यासह ८ जण अटकेत

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एमडी) प्रकाश जयसिंग चिटणीस (वय ४९, रा. हुपरी, ता. हातकणंगले) यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आमदार सतेज पाटील गटाचे समर्थक डॉ. संदीप नेजदार यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल केला.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून डॉ. नेजदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २५ ते ३० जणांनी कट करून जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख चिटणीस यांनी फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नेजदार यांच्यासह आठ जणांना अटक केली.

डॉ. संदीप विलास नेजदार (वय ५०), बबलू उर्फ प्रसन्नकुमार विश्वासराव नेजदार (४०), तुषार तुकाराम नेजदार (३२), कौस्तुभ उर्फ पुष्कराज कमलाकर नेजदार (२५), दीप सुनील कोंडेकर (२३), श्रीप्रसाद संजय वराळे (३०), पप्पू उर्फ प्रफुल्ल कमलाकर नेजदार (२३, सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर) आणि प्रवीण बाबूराव चौगुले (३२, रा. शिये, ता. करवीर) यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यांना ८ जानेवारीपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

यांच्यासह युवराज बाजीराव उलपे, निशिकांत किसन कांबळे, धनाजी पांडुरंग गोडसे, प्रवीण विश्वास नेजदार, कौस्तुभ तुकाराम नेजदार, अजित विलास पवार, शिवाजी आंबी, अनंत श्रीहरी पाटील, प्रवीण बाबूराव वराळे (सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यासह अनोळखी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल झाला.

राजाराम साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस हे मंगळवारी (दि. २) सायंकाळी कारखान्यातून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. कसबा बावड्यातील पाटील गल्ली येथे २५ ते ३० जणांनी वाहन अडवून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याबाबत, त्यांनी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

ही कलमे दाखल..

३०७ : खुनाचा प्रयत्न, ३२७ : कामात व्यत्यय, १२० ब : अपराध करण्यास चिथावणी, ३४१ : इतरांच्या अधिकारावर गदा १४३ : नोकरावर हल्ला, १४७ : हल्ल्यासाठी चिथावणी, १४९ : प्रतिबंधात्मक कारवाई, ४२७ : जमाव करून मारहाण या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकृतीत सुधारणा

मारहाणीत जखमी चिटणीस यांच्या हाताला, छातीला आणि मानेला गंभीर दुखापत झाली. सीपीआरमधील प्रथमोपचारानंतर नातेवाइकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हुपरी येथील त्यांच्या नातेवाइकांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.


भर रस्त्यात गाडी अडवून मारहाण करण्याचा प्रकार गंभीर असल्यामुळे फिर्याद दाखल होताच तातडीने आठ संशयितांना अटक केली आहे. अटकेतील संशयितांचा गुन्ह्यातील सहभाग शोधून त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल. अन्य संशयितांचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे. - अजयकुमार सिंदकर - पोलिस निरीक्षक, शाहूपुरी

Web Title: MD of Rajaram factory beaten up; Crime against 13 persons including Sandeep Nejdar in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.