मला, मुश्रीफांना राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:03+5:302020-12-12T04:41:03+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीची घोषणा अजून झालेली नसली तरी आरोपांच्या फैरी मात्र आता सुरु झाल्या आहेत. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत ...

To me, trying to get Mushrif out of politics | मला, मुश्रीफांना राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न

मला, मुश्रीफांना राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न

Next

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीची घोषणा अजून झालेली नसली तरी आरोपांच्या फैरी मात्र आता सुरु झाल्या आहेत. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्ता असताना जिल्ह्यात विकासकामे करण्याऐवजी मला व हसन मुश्रीफ यांना राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला, असा घणाघाती आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी केला. चंद्रकांत पाटील यांनी राजकारण सोडून देऊन दहा टक्के जरी मन दाखविले असते तरी शहराच्या विकासाला हातभार लागला असता, असेही पालकमंत्री म्हणाले.

कोल्हापूर शहरातील दोन रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली.

पाटील राज्यातील दोन नंबरचे मंत्री होते. त्यांच्याकडे चार महत्त्वाची खाती होती. त्यांनी मनात आणले असते तर बरीच विकासकामे करता आली असती. परंतु शहरासाठी त्यांनी काहीच केले नाही. २००९ ते २०१४ या काळात आम्ही सत्तेत होतो तेंव्हा १२०० कोटींचा निधी आणून शहराचा विकास केला. यापुढेही आम्ही प्रगतशील जिल्हा म्हणून नावलौकिक मिळेल असा विकास करून दाखवू, असे पाटील म्हणाले.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. दोन नंबरचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर विकासाची मोठी जबाबदारी होती. परंतु एकमेकांना राजकारणातून संपविण्याच्या राजकारणाचा आनंद घेण्यातच त्यांनी धन्यता मानली. शहर विकासाकडे त्यांनी पाठ फिरविली, असे मुश्रीफ म्हणाले. आम्ही आता सत्तेत आहोत. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे. आगामी निवडणुका लवकर लागल्या नाहीत तर आणखी निधी आणता येणे आम्हाला शक्य होईल, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमात खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋुतुराज पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते.

दाढीवाले बाबा

दिल्लीत दाढीवाले बाबा बसले आहेत. त्यांनी सर्व खासदारांचे निधी थांबविले आहेत. त्यामुळे कोणतीही विकासकामे होत नाहीत. विकास रोखण्याचे एक षड‌्यंत्र असल्याचे माझे वैयक्तिक मत असल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले.

लेझर शो, दीपोत्सव करणार

रंकाळा तलावावर भव्य लेझर शो तसेच पंचगंगा घाटावर वाराणसीच्या धर्तीवर दीपोत्सव साजरा करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे मुश्रीफ यांनी यावेळी जाहीर केले.

Web Title: To me, trying to get Mushrif out of politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.