मी समाजासोबत, राजकीय द्वेषातून आंदोलन, खासदार धैर्यशील माने यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:41 PM2023-11-03T12:41:56+5:302023-11-03T12:42:42+5:30
कोल्हापूर : मी सुरुवातीपासूनच मराठा समाजासोबत असून यापुढेही सदैव राहणार आहे. मराठा आरक्षणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. मात्र निव्वळ ...
कोल्हापूर : मी सुरुवातीपासूनच मराठा समाजासोबत असून यापुढेही सदैव राहणार आहे. मराठा आरक्षणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. मात्र निव्वळ राजकीय द्वेषापोटी चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे स्पष्टीकरण खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.
पेठवडगाव येथे गुरुवारी सकाळी खासदार धैर्यशील माने हरवले आहेत, असा फलक करून त्याची मिरवणूक काढण्यात आली. तर पोलिस ठाण्यात तक्रारही देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावर माने पत्रकात म्हणतात, मराठा आरक्षणाच्या संदर्भात खासदार म्हणून लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून आरक्षणाची प्रभावी मागणी केली. कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चावेळी मी रुग्णालयात असतानाही सलाईनसह सहकुटुंब मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. विनंतीला मान देऊन मी मतदारसंघातील सर्व कार्यक्रम रद्द केले.
बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून विशेष अधिवेशनाची मागणी केली. याबाबतच्या बातम्याही वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असताना कोणतीही माहिती न घेता निव्वळ राजकीय द्वेषापोटी चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून जाणूनबुजून लोक मला बदनाम करत आहेत.