कागलची अर्थवाहिनी श्री शिवाजी सोसायटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 11:44 PM2019-06-30T23:44:42+5:302019-06-30T23:44:46+5:30

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : कागल शहराला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. कागलचे यशवंतराव घाटगे हे करवीरच्या ...

The meaning of Kagal's semantic Mr. Shivaji Society | कागलची अर्थवाहिनी श्री शिवाजी सोसायटी

कागलची अर्थवाहिनी श्री शिवाजी सोसायटी

googlenewsNext

जहाँगीर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : कागल शहराला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. कागलचे यशवंतराव घाटगे हे करवीरच्या गादीला दत्तक गेले आणि राजर्षी शाहू महाराज म्हणून जगभर लोकमान्यता पावले. कागलचे तत्कालीन अधिपती श्रीमंत सर पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज हे केवळ शाहू छत्रपतींचे बंधूच नव्हते, तर मार्गदर्शकही होते. त्यामुळे जगभरात जे जे बदल, नवनवे उपक्रम पुढे आले, ते ते करवीरबरोबरच कागलमध्येही आले. त्यापैकीच एक सहकारी संस्थांची स्थापना होय. श्रीमंत जयसिंगराव ऊर्फ बाळ महाराजांच्या जन्माचे औचित्य साधत कागल शहरात दोन संस्थाही जन्मास आल्या. त्यापैकी एक कागल को-आॅप. बँक आणि दुसरी श्री शिवाजी सोसायटी होय. २० जुलै १९१७ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने एकशे एक वर्षांचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. गेली शंभर वर्षे ही संस्था ‘कागलच्या शेतकऱ्यांची अर्थवाहिनी’ बनून वाहत आहे. जशी एखादी नदी वरदायिनी बनून आजूबाजूचा परिसर समृद्ध बनविते, तशीच ही सोसायटी अर्थगंगा बनून कागलच्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदायिनी ठरली आहे.
इंग्रजांच्या राजवटीत १९०४ मध्ये भारतात सहकार कायदा लागू झाला. प्रामुख्याने सावकारी पाशातून शेतकºयाला मुक्त करण्यासाठी हा कायदा पुढे आला. त्यातून अर्थपुरवठा करणाºया पतपेढींचा उदय होत गेला. कागल जहागिरीतील नोकर लोकांची पतपेढी असे स्थापनेच्या वेळी या सोसायटीचे स्वरूप होते. पुढे जसजशी याची व्याप्ती वाढत गेली, तसे हे स्वरूपही बदलत गेले. १९४७ पर्यंत कागल संस्थानही स्वतंत्रच होते. या कालावधीत या पतपेढीला राजाश्रय लाभल्याने अधिक उलाढाल करण्यास मदत झाली. १९३५ नंतर शेतीपिकासाठी म्हणून कर्ज देण्याची पद्धत सुरू झाली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सहकार चळवळ अधिक व्यापक होत गेली. १९५९ मध्ये या संस्थेचे नाव बदलून श्री शिवाजी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा सोसायटी असे करण्यात आले. तेथून आजतागायत हे नाव कायम आहे.
कागल शहर हे जरी दूधगंगा नदीकाठी असले, तरी १९९० पर्यंत येथे बारमाही पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे बागायतदार शेतकरी कमी आणि जिरायतदार अधिक असे स्वरूप होते. अशा काळात या संस्थेने पीक कर्जाबरोबरच इंजिन, आॅईल, तेल खरेदीसाठीही अर्थपुरवठा केला. खते, औषधेही दिली जात असत. धान्य दुकान (रेशन) तर आजही सुरू आहे. १९७२ च्या दुष्काळात तर धान्य आणि जनावरांना चाराही पुरवठा करण्याचे काम या संस्थेने केले. १९८० च्या दशकापर्यंत ही संस्था शेती आणि संबंधित शेतकरी एवढ्यापुरतीच मर्यादित होती. तेव्हा संचालकपदासाठी रस्सीखेच होत नव्हती. कागलमध्ये शाहू सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यानंतर गुºहाळघरे बंद होत गेली. तंबाखू व अन्य पिकांऐवजी ऊस पिकाचा जोर वाढला. थेट नगदी रक्कम खात्यावर येऊ लागल्याने आर्थिक व्यवहारही वाढत गेले. संस्थेत राजकीय गटही निर्माण झाले.
सुरुवातीला विक्रमसिंह घाटगे यांना मानणारा संचालकांचा गट या संस्थेत आला. त्यातून मंडलिक-घाटगे असा राजकीय संघर्ष सुरू झाला. १९९० नंतर दूधगंगा नदीला बारमाही पाणी आले आणि संस्थेचाही आर्थिक प्रवास वेगवान होत गेला. संस्थेचे संचालक असलेले हसन मुश्रीफ हे जिल्हा बँकेचे संचालक, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष झाले. त्यातून ही संस्था अधिकच समृद्ध होत गेली. सध्या या संस्थेचे नेतृत्व आ. मुश्रीफ हेच करीत आहेत. १९१७ ते २०१९ असा हा संस्थेचा बदलता प्रवास खरोखरच देदीप्यमान असा आहे. स्वत:च्या मालकीची दुमजली इमारत, दुकानगाळे, २०० मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेले गोडावून आहे. संपूर्ण संगणकीकरण आणि विविध सेवा-सुविधा ही संस्था पुरवीत आहे. नवनवे बदल स्वीकारीत ही संस्था आजही कागलच्या शेतकºयांसाठी प्रमुख आधारस्तंभ बनून कार्यरत आहे.
१९७२ च्या दुष्काळात कागलकरांना दिलासा
या संस्थेने १९७२ च्या दुष्काळाच्या झळा कागलवासीयांना कमीत कमी कशा बसतील यासाठी प्रयत्न केले. या काळात विहीर खुदाई, इंजिन खरेदी, तेल, आॅईल, डिझेल पुरवठा, गूळ खरेदी-विक्री मार्गदर्शन तर केलेच, पण तत्कालीन अध्यक्ष भाऊसो भरमकर, सचिव महादेव मंडपे, बाबूराव केनवडेकर थेट भोपाळला गेले. तेथून शिप्पी जोंधळा खरेदी करून आणला. तसेच भोगावती, संकेश्वर भागातून वैरणही खरेदी करून आणून ना नफा-ना तोटा या तत्त्वाने कागलकरांना उपलब्ध करून दिली. म्हैस खरेदीबरोबरच वैरणही पुरवठा केला. दुष्काळाच्या काळात या संस्थेने कागलचे पालकत्वच निभावले.
दिग्गज संचालक असलेली सोसायटी
ही संस्था कागल तालुक्यातील सर्वांत जुनी विकास सेवा संस्था आहे. या संस्थेने अनेकांना राजकीय पटलावर आणण्याचे काम केले आहे. १९७८ ते २००९ पर्यंत आ. हसन मुश्रीफ या संस्थेचे संचालक होते. मंत्रिपदावर असतानाही ते संचालक होते. बाबगोंडा पाटील, चंद्रकांत गवळी, भैया माने, नवीद मुश्रीफ, शिवाजीराव गाडेकर, तात्यासाहेब पाटील, जुन्या काळात कै. भाऊसो भरमकर, दादोबा नाना चौगुले, व्ही. ए. घाटगे, बाळगोंडा गोनुगडे या दिग्गजांचाही उल्लेख येथे करता येईल. असे मातब्बर या संस्थेत संचालक म्हणून राहिले आहेत.

Web Title: The meaning of Kagal's semantic Mr. Shivaji Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.