अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी करणार उपाययोजना
By Admin | Published: September 12, 2015 12:30 AM2015-09-12T00:30:20+5:302015-09-12T00:51:05+5:30
देवस्थानच्या बैठकीत निर्णय : विद्यापीठाचे घेणार सहकार्य
कोल्हापूर : बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नांनंतर करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन करण्यात आले आहे. हे संवर्धन दीर्घकाळ टिकावे यासाठी पुरातत्त्व खात्याने दिलेल्या सूचना अमलात आणण्यासाठी देवस्थान समिती आता शिवाजी विद्यापीठाची मदत घेणार आहे. गाभाऱ्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी काय करता येईल, यासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याशी चर्चा करून विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. आॅगस्ट महिन्यात केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई मूर्तीचे नैसर्गिक साधनांद्वारे संवर्धन केले आहे. मात्र, हे संवर्धन दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यांनी काही मार्गदर्शक सूचना देवस्थान समिती आणि श्रीपूजकांना दिल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांची अंमलबजावणी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. देवस्थानच्या जुन्या बलभीम बँकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी होते.
देवस्थानच्या ठेवींची विविध खाती आहेत त्यात सुसूत्रता आणण्याच्या सूचना ‘आयसीआयसीआय’च्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या तसेच देवस्थान समितीच्या अनेक जागा आहे त्यांचा विकास करण्यावरही चर्चा झाली. (प्रतिनिधी)
नाग चिन्हावर चर्चा नाहीच...या बैठकीत नाग चिन्हासंबंधी चर्चा झालीच नाही. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, नाग चिन्हासंबंधी पुरातत्त्व खात्याप्रमाणेच श्रीपूजकांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांच्यावतीने उत्तर आले की यावर निर्णय घेण्यात येईल.