पूर रोखण्यासाठी पर्यावरणतज्ज्ञांच्या उपाययोजनांचा विचार व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:08+5:302021-05-25T04:29:08+5:30
कोल्हापूर : पंचगंगा व कृष्णा नदीमुळे कोल्हापूर-सांगलीला येणारा पूर रोखण्यासाठी प्रा. डॉ. जय सामंत व निवृत्त सचिव दि. वा. ...
कोल्हापूर : पंचगंगा व कृष्णा नदीमुळे कोल्हापूर-सांगलीला येणारा पूर रोखण्यासाठी प्रा. डॉ. जय सामंत व निवृत्त सचिव दि. वा. मोरे यांनी सुचवलेल्या व्यवहार्य, कायदेशीर, वस्तुनिष्ठ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.
मंत्री पाटील हे सोमवारी उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांना वरील निवेदन देण्यात आले. यावेळी खा. संजय मंडलिक, आ. राजेश पाटील, ए. वाय. पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन दिले.
राधानगरी धरणाचे पूर्वीचे सात स्वयंचलित दरवाजे वगळून अन्य दरवाजे बदलण्यात यावेत, त्याठिकाणी ऑटोमाइझड् गेट कार्यान्वित करावे, सर्व धरणे व तलावातील गाळ काढण्यात यावा, पश्चिम घाटातील खाणकाम प्रकल्प बंद करावेत, जिल्ह्यातील सर्व धरणांमधील गाळाचे मोजमाप करून ते काढण्यात यावे, नद्या, उपनद्या, ओढा, नाल्यांची रुंदी, खोली याचे मोजणी व्हावी, पुराची सरासरी व महत्तम रेषा आखून ग्रामीण व शहरी भागात होणारा भराव व बांधकामे रोखावीत, अलमट्टी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन करण्यात यावे. पूर काळात पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती नियुक्त करण्यात यावी. यासह विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
---
फोटो नं २४०५२०२१-कोल-शिवसेना निवेदन
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी शिवसेनेच्या वतीने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पूर नियंत्रणासंबंधीचे निवेदन देण्यात आले. यावेळी ए. वाय. पाटील, आ. राजेश पाटील, खा. संजय मंडलिक, विजय देवणे, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.
--