संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी उपायोजना करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:40+5:302021-05-25T04:26:40+5:30
शिरोळ : कर्नाटक राज्याशी समन्वय ठेवल्याने गतवर्षी पूर परिस्थितीवर नियंत्रण राखता आले. यावर्षीही पूर येऊ नये, अशी अपेक्षा करूया. ...
शिरोळ : कर्नाटक राज्याशी समन्वय ठेवल्याने गतवर्षी पूर परिस्थितीवर नियंत्रण राखता आले. यावर्षीही पूर येऊ नये, अशी अपेक्षा करूया. पूर परिस्थिती टाळण्यासाठी यंदाही दोन्ही राज्यांचा समन्वय ठेवण्यात येईल. प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना सुरू कराव्यात, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिल्या.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक सोमवारी पार पडली. मंत्री यड्रावकर म्हणाले, कृषी विभागाने महापुराच्या काळात निश्चित केलेल्या पूर रेषेच्या आतील पिकांचे सर्व्हेक्षण करता येईल का, याबाबत कार्यवाही करावी. एसटी महामंडळाने सन २०१९ चा अनुभव पाहता लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यासाठी बसेस ठेवण्याची व्यवस्था करावी. महापुराचे संकट जाणवू लागले तर नागरिकांनी स्वत:हून बाहेर पडावे. तर पशुधन सुरक्षितस्थळी नेण्यासाठी तालुका प्रशासनाच्यावतीने ग्रामपंचायतींना सूचना द्याव्यात. नगरपालिकांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून घ्यावी, अशा सूचना देऊन मंत्री यड्रावकर यांनी प्रशासन यंत्रणेने अधिक सतर्क राहून काम करावे, असे आवाहन केले.
बैठकीस तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, गटशिक्षणाधिकारी डी. एस. कामत, डॉ. प्रसाद दातार, सहायक निबंधक प्रेम राठोड, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, मुख्याधिकारी टिना गवळी, निखिल जाधव, तैमुर मुल्लाणी, संजय शिंदे, महावितरणचे आवळेकर, सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, अभियंता शिरीष पाटील उपस्थित होते.
कर्नाटक पाटबंधारेशी संवाद
बैठकीदरम्यान कर्नाटक शासनाच्या पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता सी. डी. पाटील यांच्याशी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या पाटबंधारे विभागामध्ये समन्वय ठेवून महापुराची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संवाद ठेवून उपाययोजना निश्चित कराव्यात, असे सांगितले.
फोटो - २४०५२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - शिरोळ येथे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, अमरसिंह पाटील, डॉ. प्रसाद दातार, शंकर कवितके उपस्थित होते.