गरजू कुंभार बांधवांना आज मिळणार यांत्रिक चाके - खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 10:17 PM2018-06-08T22:17:21+5:302018-06-08T22:17:21+5:30
लोप पावत चाललेल्या पारंपरिक कुंभार व्यवसायाचे जतन व्हावे यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोग, भारत सरकार, केंद्रीय ग्राम कुम्हारी, खानापूर यांंच्या वतीने कोल्हापुरातील गरजू व गरीब कुंभार
कोल्हापूर : लोप पावत चाललेल्या पारंपरिक कुंभार व्यवसायाचे जतन व्हावे यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोग, भारत सरकार, केंद्रीय ग्राम कुम्हारी, खानापूर यांंच्या वतीने कोल्हापुरातील गरजू व गरीब कुंभार कारागिरांना आज, शनिवारी पहिल्या टप्प्यात ३५ यांत्रिक कुंभार चाके देण्यात येणार आहेत.
कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीच्या बापट कॅम्प येथील हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, खादी ग्रामोद्योग आयोगाचे पदाधिकारी उपस्थित असतील.
पूर्वीच्या काळी मातीची भांडी वापरली जात असत. आता गणेशमूर्ती आणि फार तर विटा तयार करणे यापलीकडे कुंभारांकडे रोजगाराचे साधन नाही. त्यामुळे हा व्यवसाय आता लोप पावत आहे. या व्यवसायाला पुन्हा उभारी मिळावी यासाठी मातीपासून फ्लॉवरपॉट, भांडी, शोभेच्या वस्तू, खेळणी, मडकी अशा नावीन्यपूर्ण आणि कलात्मक वस्तूंची निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीच्या वतीने युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. सोसायटीने मागणी केल्यानंतर खादी आणि ग्रामोद्योग आयोग, भारत सरकार, केंद्रीय ग्राम कुम्हारी संस्थेने कोल्हापूर जिल्'ासाठी २०० यांत्रिक कुंभार चाके मंजूर केली आहेत. त्यांपैकी पहिल्या टप्प्यात ३५ चाके व प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.