बोगस मतदार नोंदणीविरोधात यंत्रणा ‘अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:02 AM2019-07-22T01:02:26+5:302019-07-22T01:02:29+5:30
प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी होण्याची शक्यता आहे. ...
प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी होण्याची शक्यता आहे. याची कुणकुण लागल्याने निवडणूक विभागाकडून दक्षता घेण्यात आली आहे. यामुळे नव्याने नोंदणीसाठी येणाऱ्या अर्जांची यादी उपलब्ध करून दिली जाणार असून, यातील नावांवर आक्षेप घेतल्यानंतर ती नावे रद्द केली जाणार आहेत. यासाठी यंदा प्रथमच हरकत घेण्यासाठी मतदारांना अर्र्ज नं. ७ द्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक ३९ हजार मतदारांची नावे ही मृत, दुबार, स्थलांतरित अशा कारणास्तव वगळण्यात आली. जिल्ह्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये मतदारयादीत नाव नोंदणी, वगळणी, दुरुस्ती केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली असली, तरी विधानसभा निवडणूक जवळपास सर्वच मतदारसंघांत चुरशीने होणार आहे; त्यामुळे बोगस मतदारांची नोंदणीही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. याची कुणकुण निवडणूक विभागाला लागली आहे.
पूर्वी नोंदणीचे फॉर्म निवडणूक कार्यालयांमध्ये जमा केले जात होते; त्यामुळे त्याचे पुरावे पाहणे निवडणूक विभागाला शक्य होते. यातील एखादे नाव आक्षेपार्ह आढळल्यास किंवा पुरावे नसल्यास ती नावे तत्काळ कमी केली जात होती. निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या अधिकारात ही कार्यवाही करू शकत होते; परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारयादीतील नावे स्वत:हून रद्द करायची नाहीत, असे निर्देश
आहेत.
संभाव्य बोगस किंवा आक्षेपार्ह नावांचा शोध घेण्यासाठी आॅनलाईनद्वारे नोंदणी झालेल्या फॉर्मची यादी सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये एखाद्या नावाबद्दल हरकत असेल, तर संबंधितांनी अर्ज नं. ७ भरून दिल्यानंतर त्याची शहानिशा करून ते नाव रद्द केले जाणार आहे.
नोंदणी अर्जांची यादी घेण्याचे आवाहन
मतदार नोंदणी मोहिमेत निवडणूक विभागाकडे आलेल्या अर्जांची यादी ज्यांना पाहिजे आहे, त्यांनी ताब्यात घ्यावी. यामधील नावांवर काय हरकत असल्यास ती अर्ज. नं. ७ द्वारे सादर करावी, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
आॅनलाईन नोंदणीवर नजर
मतदार नोंदणीसाठी ‘एनव्हीएसपी’ या प्रणालीद्वारे आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; त्यामुळे निवडणूक विभागाकडे येऊन थेट अर्ज देण्याचे प्रमाण कमी होणार आहे. परिणामी आॅनलाईनमुळे बोगस मतदार नोंदणीची दाट शक्यता आहे. हे गृहीत धरूनच आॅनलाईन नोंदणीवरही निवडणूक विभागाची बारकाईने नजर राहणार आहे.