“देवेंद्र फडणवीसांमुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला अन् पुराचा फटका बसला”: मेधा पाटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 07:28 PM2021-11-08T19:28:36+5:302021-11-08T19:29:15+5:30
देवेंद्र फडणवीसांमुळेच (Devendra Fadnavis) नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला आणि सामान्यांना पुराचा फटका बसला, अशी टीका मेधा पाटकर यांनी केली आहे.
कोल्हापूर: यंदाच्या वर्षी राज्यातील अनेक भागांना पुराचा मोठा फटका बसला. अगदी कोकणापासून ते विदर्भापर्यंत मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे तर मोठेच नुकसान झाले. यातच आता पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी नद्यांच्या पूररेषेवरून याधीच्या सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांमुळेच (Devendra Fadnavis) नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला आणि सामान्यांना पुराचा फटका बसला, अशी टीका मेधा पाटकर यांनी केली आहे.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मेधा पाटकर म्हणाल्या की, पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजला नाही. त्यामुळे त्यांनी क्रिडाईने पूर रेषेच्या बाबतीत दिलेला अहवाल स्वीकारला गेला. याशिवाय निळ्या आणि लाल रेषेतील बांधकामांना सरसकट सूट दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागत आहे, असे पाटकर यांनी सांगितले.
देशातील परिस्थितीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर जाऊन पर्यावरणासंदर्भात मोठमोठी वक्तव्य करत आहेत. पण, त्याच वेळी देशात काय परिस्थिती सुरू आहेत याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून महापूराची तीव्रता वाढली आहे. या सर्वाला पूररेषेच्या बाबतीत बेजबाबदारपणे निर्णय घेणाऱ्या घेणारे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा घणाघात मेधा पाटकर यांनी केला.
पूररेषेची नव्याने आखणी करणे गरजेचे
किमान आतातरी पूररेषेची नव्याने आखणी करणे गरजेचे आहे. नद्यांमधील गाळ आणि वाळू काढून खोलीकरण करणे हे पूर्णता अशास्त्रीय आहे. यातून केवळ ठेकेदारांचे भले होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी अपेक्षा आहे, असे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे. रायगड, चिपळून, कोल्हापूर आणि सांगली आलेल्या महापुराने भविष्यातील धोक्याचा इशारा दिला आहे. केवळ सरकारने नाही, तर आता यामधील अभ्यासकांनी अधिक लक्ष घालून पर्यावरणाची संरचना लक्षात घेऊन नियंत्रणासाठीचे शाश्वत उपाय अंगीकरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मेधा पाटकर यांनी सांगितले.