आजरा ग्रामीण रूग्णालयाला प्रतीक्षा वैद्यकीय अधिकाऱ्याची
By admin | Published: November 7, 2014 09:12 PM2014-11-07T21:12:58+5:302014-11-07T23:41:22+5:30
नागरिकांची गैरसोय : वयाचे दाखले, सर्टीफिकेट मिळणे झाले दुरापास्त
कृष्णा सावंत-पेरणोली -आजरा ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय सेवेसह वयाचे दाखले, मेडिकल सर्टीफिकेट मिळणे दुरापास्त झाले असून, प्रथमवर्ग वैद्यकीय अधिकार मिळणार कधी, अशी विचारणा तालुक्यातील जनतेमधून होत आहे.
आजरा ग्रामीण रूग्णालयाला गेल्या तीन महिन्यांपासून प्रथमवर्ग वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारात शिथिलता आली आहे. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयातील प्रथमवर्ग वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तात्पुरता कारभार सोपविण्यात आला आहे. मात्र, गडहिंग्लज व आजऱ्याचे प्रशासन सांभाळतात त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील गरजू लोकांना वयाचे दाखले, मेडिकल सर्टीफिकेट मिळणे अशक्य झाले आहे.
तालुक्यातील गरीब व वंचित लोकांचा दवाखाना म्हणून रूग्णालयाची ओळख आहे. दवाखान्यात बाळंतपण, सीझर, विविध प्रकारची औषधे व विविध सुविधा उत्तमप्रकारे दिल्या जात असल्याने गरीब रूग्णांसह मध्यमवर्गीय नागरिकही या दवाखान्याकडे वळतात. दवाखान्यातील सोयी, सुविधा उत्तम असल्याने दवाखान्याचा जिल्ह्यात नावलौकीक आहे.
मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून कारभारासह सेवेतही शिथिलता आली आहे. ७ ते ८ महिन्यांपासून प्रथमवर्ग वैद्यकीय अधिकाऱ्याचीही रितसर नेमणूक झाली होती. त्यामुळे प्रशासनाच्या गतीमानतेत सुधारणा होऊन रूग्णांच्या सेवेतही वाढ झाली होती. सीझर, अॅपेंडीक्स आदी शस्त्रक्रिया होऊ लागल्याने आशा कर्मचाऱ्यासह जनतेमधूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अचानक वैद्यकीय अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाने पकडल्याने ४ महिन्यांपासून प्रथमवर्ग अधिकाऱ्याविना रूग्णालयाचा कारभार सुरू झाला आहे.
रूग्णालयातील प्रिंट मशीन बंद आहे. एक्स-रे मशिनवर आॅपरेटर नाही, विविध औषधगोळ्यांचा तुटवडा आहे. दातांचे मशीन बंद आहे. त्यामुळे रूग्णालयाची प्रशासन व औषधांचा अपुरा पुरवठा या दोन्ही बाजू कमकुवत झाल्याने कुचंबना झाली आहे. प्रशासनाचा काही कारभार शिपाईच चालवत असल्याने जनतेमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रूग्णालयातील विविध प्रकारच्या बंद पडलेल्या मशीनमुळे व संगणकामुळे नागरिकांना विविध दाखल्यासह सेवेलाही मुकावे लागत आहे. त्यामुळे प्रथमवर्ग वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी कधी नेमणार अशी विचारणा होत आहे.
दाखले मिळण्यासंदर्भातील निश्चित दिवस केला जाईल. औषध पुरवठा, बंद असलेल्या मशीनबाबत त्वरीत दुरूस्ती करण्यात येईल. मागील अधिकाऱ्यांची रजा शिल्लक असल्याने नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीबाबत शक्यता कमी आहे. मात्र, रूग्णांची हेळसांड होणार नाही याची निश्चित दक्षता घेण्यात येईल.
-डॉ. बी. डी. अरसूलकर, जिल्हा शल्य चिकित्सक