वैद्यकीय पथकाची कार्यतत्परता; ऊसतोड कामगारांना रात्री भरपावसात खोपेवर जावून दिली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 02:01 PM2021-11-19T14:01:03+5:302021-11-19T14:07:27+5:30
शिरोली : दिवसभर उसाच्या फडात असणारे ऊसतोड कामगार लसीपासून वंचित राहू नयेत, यासाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने ...
शिरोली : दिवसभर उसाच्या फडात असणारे ऊसतोड कामगार लसीपासून वंचित राहू नयेत, यासाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने भरपावसात त्यांच्या खोपेवर जात त्यांना लस दिली. वैद्यकीय पथकाने दाखविलेल्या या कार्यतत्परतेचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही अभिनंदन केले आहे.
शिरोली परिसरात सध्या ऊस कामगारांनी तळ ठोकला आहे. शिरोलीसह नागाव, हालोंडी, मौजे वडगाव, टोप, संभापूर, कासारवाडी या गावात ऊसतोड मजूर आले आहेत. हे कामगार दिवसभर फडात असतात. सायंकाळी सातनंतरच ते आपल्या खोपेवर येतात. त्यामुळे त्यांना लस देण्यात अडचणी येत होत्या. शेवटी या कामगारांना सायंकाळी सातनंतर खोपीवर जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्युज यांनी घेतला.
बुधवारी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक त्यांच्या खोपेवर जात असतानाच पाऊस आला. मात्र, या कामगरांना लस देणे गरजेचे असल्याने या पथकाने भरपावसात सायंकाळी सातनंतर कामगारांच्या खोपेवर जाऊन त्यांना लस दिली. शिरोली आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने दाखविलेल्या कार्यतत्परतेचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी अभिनंदन केले. लसीकरणासाठी डॉ. पंकज पाटील, आरोग्यसेवक अभिजित शिंदे, परवेज काजी, एस.आर.कांबळे, सालोमन कदम, विद्या पाटील, सरदार पाटील यांनी सहभाग घेतला.