औषधी वनस्पतींच्या शेतीचा मार्गदर्शक

By Admin | Published: September 22, 2015 12:19 AM2015-09-22T00:19:44+5:302015-09-22T00:33:09+5:30

कृषीक्रांतीचे शिलेदार

Medicinal farming guide | औषधी वनस्पतींच्या शेतीचा मार्गदर्शक

औषधी वनस्पतींच्या शेतीचा मार्गदर्शक

googlenewsNext

संपूर्ण घराण्याला एक संस्कृती असेल, तर मुले थोरांचे अनुकरण करत त्याच मार्गाने जायचा प्रयत्न करतात. कौल घराण्याचा आजही देशातील राजकारणात मोठा दबदबा असला तरी कैलासनाथ कौल यांनी निसर्ग विज्ञानात त्यातही वनस्पतीशास्त्रात एवढे मोठे कार्य करून ठेवले आहे की उद्यानशास्त्रात आणि फलोद्यानशास्त्रात तज्ज्ञ म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
आई राजमती आणि वडील जवाहर मुल अटल कौल या काश्मिरी पंडित दांपत्याच्या पोटी कैलासनाथ यांचा जन्म १९०५ मध्ये झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे मेहुणे होते. त्यांचे आजोबा काश्मीर संस्थानचे दिवाण होते. शालेय जीवनात कैलासनाथ विज्ञान वगळता अन्य विषयांचा अभ्यास करीत नसत.
गांधीजींच्या प्रेरणेने ते स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले. परिणामी, ब्रिटीश सरकारने त्यांचा खारफूट जमिनीवर केलेल्या संशोधनाचा पीएच.डी. प्रबंध जप्त केला. पुढे १९३७ मध्ये पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांच्या सल्ल्यावरून त्यांची वनस्पतीतज्ज्ञ म्हणून ब्रिटीश सरकारने नियुक्ती करुन त्यांना अफगाणिस्तान येथे पाठविले. तेथून त्यांच्या या विषयातील कार्याला व संशोधनाला सुरूवात झाली. अफगाणिस्तानात त्यांनी पेशावर कोहात आणि बानू जिल्ह्यात उद्याने उभारण्याचे कार्य केले.
लखनौ येथे नॅशनल बोटॅनिकल गार्डन म्हणजेच आजची नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट त्यांनी तयार केली. इंग्लंडमध्ये रॉयल बोटॅनिकल गार्डनमध्ये पहिले भारतीय संशोधक म्हणून काम केले. इंग्लंडमधील विविध विद्यापीठात संशोधन केले. १९६५ पर्यंत राष्ट्रीय उद्यानप्रमुख म्हणून ते कार्य पहात राहिले. त्यांच्या कार्यकाळात लखनौ येथील नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूूट उद्यान जगतातील पहिल्या पाच उद्यानात गणले जात असे. त्यांनी भारताबरोबर अन्य देशांतही उद्याने उभारणीत मोठे कार्य केले. श्रीलंकेतील पॅराडेनिया, इंडोनेशियातील बोगोर, थायलंडमधील बँकॉक उद्यान तसेच सिंगापूर, हाँगकाँग, फिलीपाईन्स येथे उद्याने उभारली. १९५३ ते १९६५ या कालखंडात त्यांनी काराकोरम पर्वतरांगांपासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून पूर्व भारत अरुणाचल प्रदेशापर्यंत वनस्पती, पिकांचे सर्वेक्षण करून प्रांत सूची बनवली. फलोद्यानशास्त्र विकसित करण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग केला. त्यांनी काश्मीरमध्ये प्रामुख्याने वाढत असलेल्या दवणा या वनस्पतीवर मूलभूत संशोधन केले. या वनस्पतीपासून मिळणारे सँन्टोनिन व त्याचे औषधी उपयोग शोधून काढले. त्याशिवाय विविध औषधी वनस्पती व त्यांचे शास्त्रशुध्द उत्पादनाचे तंत्र त्यांनी सांगितले. पर्यायाने भारतात औषधी वनस्पतीच्या शेतीस सुरूवात झाली.
त्यांनी भारतीय पॉलिओबोटॅनिकल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून १९६८ मध्ये काम पाहिले. तर १९७५मध्ये कानपूरच्या चंद्रशेखर आझाद अ‍ॅग्रीकल्चरल आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड झाली. भारतात औषधी वनस्पतीच्या किफायती उत्पादनासाठी त्यांनी मोठे कार्य केले. वनस्पतीपासून मिळणारे लाकूड, इंधन, खते, औषधे, पशुखाद्य, रसायने, फर्निचरयुक्त लाकूड, पशुपालन, मृदासंवर्धन आणि सौंदर्यप्रसाधने या सर्व क्षेत्रात संशोधन केले. जगभरातील मोठ्या वैज्ञानिकांच्या संशोधनाचा भारताला कसा उपयोग करून देता येईल याचा ते सातत्याने विचार करायचे. पुढे त्यांच्याच संकल्पनेतून भारतात विज्ञान मंदिराची उभारणी झाली. पुढे शासनाने ही संकल्पना स्कूल आॅफ सायन्स म्हणून स्वीकारली. शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. डॉ. व्ही. एन. शिंदे उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

Web Title: Medicinal farming guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.