कोल्हापुरात आढळला औषधी ‘काळा कुडा’ वृक्ष, वारसा वृक्ष म्हणून जपण्याची मागणी
By संदीप आडनाईक | Published: April 13, 2023 07:10 PM2023-04-13T19:10:39+5:302023-04-13T19:11:05+5:30
औषधी गुणांनी युक्त वृक्षाची वारसा वृक्ष म्हणून जतन करण्याची मागणी
कोल्हापूर : शहर आणि परिसरातील वृक्षांचे सर्वेक्षण करताना वनस्पती अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे आणि वृक्षमित्र पारितोष उरकुडे यांना राजारामपुरी येथे नक्षत्र उद्यानामध्ये ‘काळा कुड्याचे’ दोन वृक्ष आढळले. या औषधी गुणांनी युक्त वृक्षाची वारसा वृक्ष म्हणून जतन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सन्मित्र हौसिंग सोसायटी आणि कोरगावकर हौसिंग सोसायटी यांच्या सदस्यांनी तयार केलेल्या या नक्षत्र उद्यानात इतर महत्त्वाच्या वनस्पतींसोबत काळ्या कुड्याचे वृक्ष आढळले. हे वृक्ष देशात नैसर्गिकरीत्या राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशातील आणि दक्षिण भारतात आढळून येतात. महाराष्ट्र तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पती कोशामध्ये याची नोंद आढळते.
रुई (ॲपोसायनेसी) कुळातील या वृक्षाला मराठीत कृष्णकुटज, काळी कुडई, गोड इंद्रजव अशीही नावे आहेत. शास्त्रीय नाव राइटिया टिंक्टोरिया असे आहे. विल्यम राईट या स्कॉटिश वनस्पतीतज्ज्ञाच्या स्मरणार्थ त्याला नाव दिले आहे. हा पानझडी वृक्ष ३-७ मीटर उंच वाढतो. याची साल गुळगुळीत आणि करड्या रंगाची असून सर्वांगामध्ये पांढरा चीक असतो. पाने साधी, गुळगुळीत आणि हिरवीगार असतात. याला एप्रिल-मे महिन्यात फुले येतात. फांद्यांच्या टोकाला चांदणीसारखी पांढरी, सुवासिक फुले येतात.
याच्या लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे बनविण्यासाठी तसेच कंगवे, मूर्ती, खेळणी बनविण्यासाठी होतो. पानांपासून निळा रंग तयार करतात. बियांना इंद्रजव म्हणतात. याची साल शक्तिवर्धक असून बी कामोत्तेजक आहे. या झाडाचा उपयोग कावीळ, सर्पदंश, दातदुखी, रक्तदोष, यकृताचे व पित्ताशयाचे रोग, मूळव्याध इत्यादींवर होतो.
कोल्हापुरातील औषधी गुणांनीयुक्त एकमेव अशा या ‘काळा कुडा’ वृक्षाला ‘हेरिटेज ट्री अर्थात वारसा वृक्षाचा’ दर्जा देणे आवश्यक आहे. - डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे, वनस्पती अभ्यासक