कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, मीनल शिंदे यांची लेफ्टनंट कर्नलपदी बढती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:47 PM2022-03-25T12:47:35+5:302022-03-25T12:48:40+5:30
मीनल शिंदे-चव्हाण यांचे उंब्रज (जि. सातारा) तालुक्यातील हनुमानवाडी हे गाव होय. घरच्या बिकट परिस्थितीतही त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना उच्चशिक्षण देण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या.
कोल्हापूर : देशाच्या सीमेवर रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या कोल्हापूरच्या रणरागिणी, डेप्युटी कमांडर मीनल शिंदे-चव्हाण यांना बुधवारी लेफ्टनंट कर्नलपदी पदोन्नती मिळाली. कमांडिंग ऑफिसर कर्नल चेनत मोसन यांच्या हस्ते पदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांच्या या पदोन्नतीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
मीनल शिंदे-चव्हाण यांचे उंब्रज (जि. सातारा) तालुक्यातील हनुमानवाडी हे गाव होय. घरच्या बिकट परिस्थितीतही त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना उच्चशिक्षण देण्याचा निर्धार केला. शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांची सातारा येथील गुरूकुलमध्ये निवड झाली. कलाशाखेची त्यांनी पदवी पूर्ण केली. सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याचा त्यांचा निर्धार होता. त्यासाठी त्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या. त्यांनी दिलेल्या स्पर्धा परीक्षेत (युपीएससी) २००८ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. देशातील पहिल्या पाच क्रमांकामध्ये त्यांना स्थान मिळाले.
थंडीत दोन वर्षे उल्लेखनीय सेवा
चैन्नई येथील प्रशिक्षण पूर्ण करून सेवेची सुरुवात जम्मू-काश्मीर येथील राजोरी, पूँछ, नारिया या संवेदनशील भागांत यशस्वीरित्या पूर्ण केले. कॅप्टनपदी पद्दोन्नतीच्या बदली पदावर त्यांनी लेह-लडाख येथे दोन वर्षे थंडीत उल्लेखनीय सेवा बजावली. त्यांचा विवाह उप-अधीक्षक सुशांत चव्हाण यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांनी रांची, गुहाटी, आसाम येथे यशस्विरित्या कर्तव्य बजावले. सध्या त्यांच्याकडे एएससी बटालून देहराडून येथे डेप्युटी कमांडरचा पदभार होता. त्यांना बुधवारी लेफ्टनंट कर्नलपदी पद्दोन्नती मिळाली.