पहिल्यांदाच सभा खेळीमेळीत
By admin | Published: July 17, 2016 12:41 AM2016-07-17T00:41:50+5:302016-07-17T01:03:49+5:30
गडहिंग्लज नगरपालिका : विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी टाळली टीकाटिप्पणी
गडहिंग्लज : गेली पाच वर्षे एकमेकांवर टीकाटिप्पणी करणारे, आरोप-प्रत्यारोप करणारे आणि कोणत्याही लहान-सहान कारणावरून सभागृह डोक्यावर घेणाऱ्या दोन्ही बाजंूच्या नगरसेवकांनी मौन पाळणे पसंद केले. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात आटोपलेली येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच खेळीमेळीत पार पडली.
नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. त्यांनी प्रारंभीच वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून अजेंड्यावरील विषयांवर आणि मुद्द्यांवरच बोलावे, असे आवाहन केले. त्यानंतर नरेंद्र भद्रापूर यांनी पाच वर्षांतील आपल्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करीत आहोत, असे स्पष्ट केले. त्यामुळे सभेची सुरुवातच सकारात्मक झाली.
एका सफाई कामगाराला सेवेत कायम करण्याच्या आणि अनुकंपा तत्त्वाखाली एका वाहनचालकाच्या नेमणुकीबाबत सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजंूच्या नगरसेवकांनी आग्रही भूमिका घेतली. मुरगूड पालिकेच्या धर्तीवर या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची सूचना त्यांनी केली. मात्र, शासन निर्णय व नियमाप्रमाणेच कार्यवाही होईल, असे मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी स्पष्ट केले. चर्चेत रामदास कुराडे, हारुण सय्यद, लक्ष्मी घुगरे, बसवराज खणगावे यांनीही भाग घेतला. (प्रतिनिधी)