‘कुंभी’ची सभा ऑफलाइन घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:21 AM2021-03-07T04:21:08+5:302021-03-07T04:21:08+5:30
कोपार्डे : ऊस बिले, तोडणी वाहतूक बिले, कामगार पगार थकल्याने सभासद आक्रमक होणार असल्याने ‘कुंभी-कासारी’ची सभा ऑनलाइन घेण्याचा घाट ...
कोपार्डे : ऊस बिले, तोडणी वाहतूक बिले, कामगार पगार थकल्याने सभासद आक्रमक होणार असल्याने ‘कुंभी-कासारी’ची सभा ऑनलाइन घेण्याचा घाट घातला जात आहे. त्याला विरोध करत वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या हक्कासाठी ऑफलाइन घ्यावी, अशा मागणीचे साखर कारखाना उपाध्यक्षांना निवेदन शनिवारी देण्यात आले.
यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुंभी-कासारीचे उपाध्यक्ष निवास वातकर यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी यशवंत बँकेचे संचालक निवास पाटील, प्रकाश पाटील, सुभाष पाटील उपस्थित होते.
यावेळी एकनाथ पाटील म्हणाले, कामगारांचा अकरा महिन्यांचा पगार, ऊसतोडणी वाहतूक बिले थकली आहेत याबाबत विरोधक आक्रमक होतील म्हणून ‘कुंभी’च्या प्रशासनाने ऑनलाइन वार्षिक सभा घेण्याचा घाट घातला जात आहे.
यावेळी यशवंत बँकेचे संचालक निवास पाटील यांनी, बिले थकल्याने स्थानिक ऊसतोड मजूर व वाहतूकदार दुसऱ्या कारखान्याकडे वळला आहे. शेतकऱ्यांना खुद्द तोड करून ऊस कारखान्याला पाठवावा लागत आहे. स्थानिक तोडणी वाहतूकदारांना वेळेत बिले अदा करा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना ऑनलाइन सभेमुळे आपलेेे प्रश्न मांडता येणार नाहीत. यासाठी सभा ऑफलाइन घ्या, अशी मागणी केली.
यावेळी नामदेव पाटील, युवराज पाटील, दादासो पाटील, एस. एम. पाटील, बी. आर. पाटील उपस्थित होते.
-
जिल्हाधिकाऱ्यांचा ऑफलाइन सभा घेण्यास नकार : निवास वातकर
‘ कुंभी-कासारी’ची वार्षिक सभा ऑफलाइन घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती, पण कोरोनाचा वाढलेला संसर्ग यामुळे ऑनलाइन सभा घेण्याचे निर्देश देत जिल्हाधिकाऱ्यांनी ऑफलाइन सभा घेण्यास परवानगी दिलेली नाही, असे कुंभी-कासारीचे उपाध्यक्ष निवास वातकर यांनी सांगितले.
यावेळी निवास वातकर म्हणाले, शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑनलाइन सभेचे नियोजन असून यात प्रश्न विचारण्याची मुभा राहणार आहे. सभासदांचे हक्क डावलले जाणार नाहीत. यावेळी सचिव प्रशांत पाटील उपस्थित होते.
फोटो
कुंभी-कासारी कारखान्याने ऑफलाइन सभा घेऊन सभासदांचा हक्क जपावा, अशा मागणीचे निवेदन यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर यांनी निवेदन स्वीकारले.