पी.एन., महाडिक, आवाडे प्रदेशाध्यक्षांना भेटणार
By admin | Published: November 15, 2015 01:04 AM2015-11-15T01:04:22+5:302015-11-15T01:04:51+5:30
विधानपरिषदेचे राजकारण : उद्या मुंबईला जाणार; सतेज पाटील यांचा पन्हाळा, शाहूवाडी दौरा
कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री प्रकाश आवाडे हे उद्या, सोमवारी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या भेटीला मुंबईला रवाना होणार आहेत. प्रदेशाध्यक्षांशी चर्चा झाल्यानंतरच निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे. सतेज पाटील यांनी शनिवारी पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांतील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
विधानपरिषदेची कोल्हापूरची जागा काँग्रेस पक्षाकडे आहे; पण काँग्रेसअंतर्गत कुरघोडीचे राजकारण पाहता ही निवडणूक काँग्रेसला तितकीशी सोपी जाणार नाही. काँग्रेसकडून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे. सतेज पाटील व आमदार महाडिक यांनी प्रचार सुरू केल्याने काँग्रेसअंतर्गत लढाई निश्चित आहे. उमेदवारीवरून झालेल्या पेचावर चर्चा करण्यासाठी पी. एन. पाटील, आमदार महाडिक, आवाडे हे उद्या, सोमवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भेटीला जाणार आहेत. साधारणत: सकाळी साडेदहा वाजता हे नेते प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार असून, त्यानंतर उमेदवारीच्या दिशा स्पष्ट होणार आहेत. चव्हाण यांनी त्यांना भेटीसाठी वेळ दिली आहे.
आता काँग्रेसमध्ये महाडिक यांनी आम्हा तिघांपैकी कुणालाही उमेदवारी द्या, परंतु सतेज पाटील यांना नको, अशी भूमिका घेतली आहे. तर महापालिका निवडणूकीत पक्षाच्या विरोधात थेट ताराराणी आघाडीच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात आणल्याने व या आघाडीची भाजपबरोबर आता युती असल्याने महाडिक यांना उमेदवारी मागण्याचा हक्कच नसल्याचा दावा सतेज पाटील करत आहेत. त्यातूनच मग या दोघांनाही बाजूला करून तडजोडीचा उमेदवार म्हणून पी. एन. पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे, परंतु पी. एन. यांना ही उमेदवारी मिळाल्यास महाडिक रिंगणातून बाहेर जाणार की स्वरूप महाडिक यांना भाजप किंवा अपक्ष म्हणून रिंगणात आणणार यासंबंधीची संदिग्धता कायम आहे. पी. एन. यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यास महाडिक थांबणार असतील तर मग निवडणूक बिनविरोध होणार की अन्य कांही राजकारण आकारास येणार याबध्दलही कमालीची उत्सुकता आहे.
दरम्यान, शनिवारी सतेज पाटील यांनी पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांतील जिल्हा परिषदेचे सदस्य, सभापती व नगरपालिकांचे नगरसेवक यांची भेट घेतली. आमदार महादेवराव महाडिक यांनीही उर्वरित भागांचा दौरा करून नेत्यांसह मतदारांशी चर्चा केली.
असेही काँग्रेसचे राजकारण..
महापालिका निवडणुकीत सतेज पाटील यांनी एकहाती यंत्रणा राबवून काँग्रेसला विजय मिळवून दिला. त्यांना काही प्रमाणात जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची मदत झाली, परंतु महाडिक हे काँग्रेसच्या प्रचारात कुठेच नव्हते, तसेच प्रकाश आवाडेही या निवडणुकीकडे साधे फिरकलेही नव्हते. तरीही विधानपरिषदेच्या उमदेवारीचा विषय निघाल्यावर उमेदवारी मला द्या म्हणून हे दोघे सगळ््यात पुढे असे चित्र सध्या दिसत आहे. यालाच काँग्रेसचे ‘राजकारण’ म्हटले जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.