युतीची जाही सभा आता गांधी मैदान ऐवजी तपोवनात: २४ मार्चला होणार जाहीर सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 04:13 PM2019-03-18T16:13:08+5:302019-03-18T16:14:47+5:30
शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरातून फुटणार आहे. २४ मार्चला सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान येथे होणारी जाहीर सभा आता कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर होणार आहे. गर्दीचा उच्चांक होणार असल्याने युतीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरातून फुटणार आहे. २४ मार्चला सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान येथे होणारी जाहीर सभा आता कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर होणार आहे. गर्दीचा उच्चांक होणार असल्याने युतीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करवीरनिवासीनी अंबाबाईच्या साक्षीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचा इतिहास आहे. तोच वारसा पुढे चालवत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरातून फोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत २४ मार्चला जाहीरसभेद्वारे प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे.
यासाठी शिवाजी पेठेतील गांधी मैदान निश्चित करण्यात आले होते. परंतु कोल्हापूर, हातकणंले, सांगली, सातारा जिल्ह्यतील युतीचे उमेदवारांसह कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याने गर्दीचा उच्चांक होणार आहे. या मैदानात एक लाख खुर्च्याच बसू शकतात, मात्र, सुमारे तीन लाख लोक या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे हे मैदान अपुरे पडणार आहे. त्यासाठी पर्यायी प्रशस्त मैदान घ्यावे, त्यानुसार तपोवन मैदान हे प्रशस्त असून सुमारे तीन लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते, असे युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविले आहे. त्यानुसार तपोवन मैदानावर सभेची तयारी करा असे वरिष्ठ पातळीवर निर्देश आले आहेत. त्यानुसार नियोजन करण्यता युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्यस्त आहेत.
५० हजार महिला शिवसैनिक येणार
कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा मतदारसंघातील सुमारे ५० हजार महिला शिवसैनिक या जाहीर सभेला आणण्याचा संकल्प परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोडला आहे. त्यानुसार जोरदार तयारी सुरु आहे.