‘प्राधिकरणा’ची बैठक बुधवारी, शनिवारची बैठक रद्द : बैठकीतून ग्रामस्थांची संभ्रमावस्था दूर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 04:21 PM2018-07-28T16:21:48+5:302018-07-28T16:24:27+5:30
कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाची शनिवारी होणारी बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अचानक मुंबईला गेल्यामुळे रद्द करण्यात आली. हीच बैठक बुधवारी (दि.१ आॅगष्ट) रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापरिषदेच्या सभागृहात होणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाची शनिवारी होणारी बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अचानक मुंबईला गेल्यामुळे रद्द करण्यात आली. हीच बैठक बुधवारी (दि.१ आॅगष्ट) रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापरिषदेच्या सभागृहात होणार आहे.
कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणामध्ये समाविष्ट असलेल्या ४२ गावाचा प्राधिकरणाला विरोध वाढत आहे. ‘प्राधिकरण’बाबत या समाविष्ट गावांना माहिती नसल्याने या गावामध्ये प्रधिकरणाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सर्वच गावांनी प्राधिकरण नकोच अशीच भूमीका घेतली आहे. समाविष्ट गावातील पदाधिकारी व नेत्यांच्या वारंवार बैठका होऊन कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘प्राधिकरण’ म्हणजे काय? या प्राधिकरणाचे काम काय? प्राधिकरणामुळे समाविष्ट गावांना निधी कसा मिळणार, त्यां गावांचा विकास कसा साधणार? याबाबत असणारी संभ्रमास्था, गैरसमज दूर करण्यासाठी अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राधिकरण समितीची बैठक शनिवारी निश्चित केली होती. पण मंत्री पाटील यांना एका बैठकीसाठी अचानक मुंबईला जावे लागल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे हीच बैठक बुधवारी (१ आॅगष्ट) रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात होत आहे.
या बैठकीस मंत्री पाटील यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, समाविष्ट ४२ गावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, करवीर व हातकणंगले तालुका पंचायत समिती सभापती उपस्थित राहणार आहेत.