सतेज पाटील-कोरे यांच्यात बैठक
By admin | Published: March 29, 2015 11:55 PM2015-03-29T23:55:14+5:302015-03-30T00:12:14+5:30
गोकुळ, केडीसीसीचे राजकारण : राष्ट्रवादीच्या दुय्यम फळीतील नाराजही भेटले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये (गोकुळ) व केडीसीसी बँकेच्या निवडणुकीबाबत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी मंत्री विनय कोरे यांची रविवारी चर्चा केली. या चर्चेदरम्यान जागावाटपासह नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुय्यम फळीतील नाराज गटही भेटून गेले.
रविवारी सायंकाळी अजिंक्यतारा येथे सतेज पाटील व विनय कोरे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. ‘गोकुळ’ निवडणुकीत समर्थक व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. जिल्हा बँकेसाठी ४ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून अर्ज दाखल करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला आहे. चर्चेदरम्यान दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी नेत्यांनी डावलेल्या दुय्यम फळीतील नाराज नेत्यांनीही पाटील व कोरे यांच्याशी चर्चा केली. त्यात आमच्या कामाची दखल घ्यावी. आम्ही आपणाला साथ देऊ, अशी ग्वाही या दुय्यम फळीतील नेत्यांनी दोन्ही नेत्यांना दिली. बैठकीला दोन्ही नेत्यांव्यतिरिक्त जवळचे कार्यकर्ते उपस्थित होते. या चर्चेत काँग्रेसमधील एक नाराज गटही यावेळी दोन्ही नेत्यांना भेटला. या नाराज गटाने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांना दोन जागा व भाजपासाठी एक जागा कशासाठी सोडायची, याबद्दल नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
नव्या चेहऱ्यांना संधी देणार
केडीसीसीसह ‘गोकुळ’मध्ये हंगामी काळात एकत्र आल्यानंतर बँकेत आपल्या पॅनेलमध्ये बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत यावेळी दोन्ही नेत्यांनी दिले. आगामी काळात बँकेसह ‘गोकुळ’चा कारभार अत्यंत अभ्यासपूर्ण करावा लागणार असल्याने अभ्यासू कार्यकर्त्यांना दोन्ही ठिकाणी संधी देण्यावर विचारविनिमय करण्यात आला. दोन्ही संस्थांच्या निवडणुकीबाबत काय परिस्थिती आहे, याची चाचपणी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी केली. नाराज गटासह प्रमुख नेत्यांना स्वतंत्ररित्या बोलावून चर्चा करण्यात आली.