‘एफआरपी’बाबत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:24 AM2019-01-07T00:24:42+5:302019-01-07T00:24:47+5:30
कोल्हापूर : एफआरपी व बॅँकांकडून मिळणारी उचल यामध्ये ५00-६00 रुपयांची तफावत असून, तेवढी रक्कम बॅँकांना देण्यास तयार नसल्याने सरकारच्या ...
कोल्हापूर : एफआरपी व बॅँकांकडून मिळणारी उचल यामध्ये ५00-६00 रुपयांची तफावत असून, तेवढी रक्कम बॅँकांना देण्यास तयार नसल्याने सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देणेच शक्य नाही. याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी (दि. १०) बैठक आयोजित केली आहे, तत्पूर्वी मंगळवारी (दि. ८) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अडचणी मांडण्याचा निर्णय रविवारी झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला.
एफआरपीबाबत जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक रविवारी कोल्हापुरात झाली. यामध्ये ऊस दरावरून निर्माण झालेल्या कोंडीवर चर्चा झाली. हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले, तरी शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडलेली नाही. शेतकºयांची कर्जे थकली असून, खते, बियाणे व औषधांसाठी शेतकºयांकडे पैसे नाहीत. याबद्दल शेतकºयांमध्ये असंतोष असल्याची चर्चाही बैठकीत झाली; पण एफआरपीची रक्कम व बॅँकांकडून मिळणारी उचल यात मोठी तफावत असून, तेवढी कर्जरूपाने उचल वाढवून देण्यास बॅँका तयार नसल्याने एकरकमी पैसे देणेच अशक्य आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गुरुवारच्या बैठकीपूर्वी उद्या, मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची विनंती कारखानदारांनी केली. त्यानुसार मंगळवारी मोजकेच कारखानदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यामध्ये मदतीची विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, के. पी. पाटील, योगेश पाटील, आदी उपस्थित होते.
‘स्वाभिमानी’च्या धास्तीने भरणा थांबविला
कारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्क्यांप्रमाणे उसाची बिले भरण्याची तयारी केली होती. आज, सोमवारपासून त्याचा भरणा संबंधित बॅँकांत केला जाणार होता; पण ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने एफआरपीचे तुकडे करून पैसे दिले तर कारखाने बंद पाडण्याचा इशारा दिला होता. कारखानदारांनी त्याचा धसका घेऊन भरणाच थांबविला.