शिरोली, हुपरी नगरपालिकेसंबंधी २७ मार्चला मंत्रालयात बैठक
By admin | Published: March 22, 2015 10:32 PM2015-03-22T22:32:05+5:302015-03-23T00:45:48+5:30
शहरातील राजकीय लोकांना वाटत होते. शिरोली औद्योगिक वसाहत म्हणजे कराच्या रूपाने सोन्याची अंडी देणारी कोंबडीच आहे.
शिरोली : शिरोली आणि हुुपरी नगरपालिका मंजुरीबाबत शुक्रवारी (दि. २७) दुपारी तीन वाजता नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याबरोबर मुंबईत मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगरविकास सचिव व अधिकारी आणि स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शिरोली आणि हुपरी ही हातकणंगले तालुक्यांतील दोन्ही गावे मोठी आहेत. या दोन्ही गावांचे गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतंत्र ‘क’ वर्ग नगरपालिका मंजुरीबाबत शासनदरबारी प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. ‘क’ वर्ग नगरपालिकेसाठी शासनाच्या सर्व नियमांत या दोन्ही गावांचा समावेश होतो, पण अद्याप या गावांच्या नगरपालिकेला मंजुरी मिळालेली नाही.
शिरोलीला हद्दवाढीत घ्यायचे, असे शहरातील राजकीय लोकांना वाटत होते. शिरोली औद्योगिक वसाहत म्हणजे कराच्या रूपाने सोन्याची अंडी देणारी कोंबडीच आहे. त्यामुळे महापालिकेनेही हद्दीवाढीच्या प्रस्तावात शिरोली आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींचा समावेश केला होता, पण युती शासनाने कोल्हापूर महापालिका हद्दवाढीला सतरा गावांचा विरोध असल्याने ‘हद्दवाढ रद्द’ची घोषणा नुकतीच केली आहे. सध्या शिरोलीला ‘क’ वर्ग नगरपालिकेचा प्रस्ताव शासनदरबारी असल्याने शुक्रवारी (दि. २७) दुपारी तीन वाजता मंत्रालयात राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी राजाराम माने, हातकणंगलेचे तहसीलदार दीपक शिंदे, नगरविकास सचिव व नगरविकास खात्याचे अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायतींचे सरपंच आणि प्रतिनिधी यांची बैठक होणार आहे. (वार्ताहर)