मिरजेत पंजांची भेट, सरबत गाड्यांच्या मिरवणुकीने मोहरमची सांगता
By admin | Published: November 4, 2014 10:07 PM2014-11-04T22:07:48+5:302014-11-05T00:07:23+5:30
पहाटे बाराईमाम दर्गा परिसरात पंजांच्या भेटीनंतर दुपारी मिरवणुकीने सरबत वाटप करण्यात
मिरज : मिरजेतील पंजांच्या चौथ्या भेटीने व सरबत गाड्यांच्या मिरवणुकीने मोहरमचा समारोप झाला. पहाटे बाराईमाम दर्गा परिसरात पंजांच्या भेटीनंतर दुपारी मिरवणुकीने सरबत वाटप करण्यात आले. मिरवणूक मार्गावर महापालिकेसह विविध सामाजिक संस्था, संघटनांतर्फे सरबत गाड्यांचे स्वागत करण्यात आले.
बाराईमाम दर्गा येथे आज पहाटे मीरासाहेब दर्गा येथून आलेल्या पंजांची चौथी भेट पार पडली. पंजांच्या भेटीसाठी भाविकांची मोठी गर्दी होती. भेटीनंतर सायंकाळी पंजांचे विसर्जन झाले. मानाच्या बैलगाड्यांतून नगाऱ्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कमानवेस मित्र मंडळ, बोलवाड येथील बारगीर यांचा मानाचा ताबूत सहभागी होता. गोल्डन ग्रुपने मक्केची सुंदर प्रतिकृती साकारून मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधले.
मिरवणूक मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. शहरातील मार्केट ते मीरासाहेब दर्गा चौकदरम्यान मिरवणुकीद्वारे सजविलेले ट्रक, ट्रॅॅक्टर, टेम्पोतून सरबताचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी मिरवणूक मार्गावर मोठी गर्दी केली होती होती. मिरवणूक मार्गावर खादीम ग्रुप सर्कल, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका यांच्यातर्फे स्वागत क क्ष उभारण्यात आले होते. सुमारे २०० वाहने आणि हजारो भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. स्वागत कक्षातून महापालिका आयुक्त अजिज कारचे, नगरसेवक बसवेश्वर सातपुते, समीर मालगावे, संजय मेंढे, अतहर नायकवडी, विठ्ठल खोत, साजिद पठाण, अल्लाबक्ष नदाफ, सहाय्यक आयुक्त टीना गवळी यांच्यासह मान्यवरांनी सरबत गाड्यांचे स्वागत केले. सायंकाळी दर्गा चौकात मिरवणुकीचा समारोप झाला. (वार्ताहर)
सांगली शहरात खोजा समाजातर्फे मोहरमनिमित्त शोक मिरवणूक
सांगली : मोहरमनिमित्त खोजा समाजातर्फे आज, मंगळवार दुपारी शहरातून शोक मिरवणूक (मातम) काढण्यात आली. मोहरमनिमित्त ३९ मंडळांकडून ८५ पंजे व एका ताबुताची स्थापना करण्यात आली होती. या सर्व मंडळांची रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरु होती. खोजा समाजातर्फे खोजा कॉलनीतून शोक मिरवणुकीस प्रारंभ झाला. हळद भवनमार्गे काँग्रेस भवनजवळ ही मिरवणूक आली. करबलाच्या हुतात्म्याच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन गेल्या अनेक वर्षांपासून ही शोक मिरवणूक काढली जात आहे. काँग्रेस भवनपासून राजवाडा चौक, कापड पेठ, बालाजी चौक, टिळक चौक या मार्गावरुन कृष्णा नदीवर मिरवणुकीची सांगता झाली. ठिकठिकाणी सरबत वाटप झाले. मिरवणुकीत महम्मदभाई खोजानी, अकबरभाई खोजानी, सादीक रेजानी, शाफीन रुपानी आदी सहभागी झाले होते. शहरात स्थापन करण्यात आलेल्या ३९ मंडळांच्या पंजांची सायंकाळी विसर्जन मिरवणूक निघाली. डॉल्बी, ताशांच्या निनादात या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या.