खर्चीवाल्यांच्या मजुरीवाढीची बैठक निष्फळ
By admin | Published: February 15, 2016 10:16 PM2016-02-15T22:16:25+5:302016-02-16T00:01:47+5:30
प्रांताधिकारी पुन्हा बैठक बोलविणार : यंत्रमागधारक-व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक; वादावादीमुळे तणाव
इचलकरंजी : खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसाठी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत सुमारे दोन तास चर्चा झाली. मात्र, व्यापारी असोसिएशनने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीत यंत्रमागधारक व व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडून काहीवेळ तणाव निर्माण झाला. अखेर याप्रकरणी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी पुन्हा बैठक आयोजित केल्यानंतर याबाबत तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले.
सन २०१३ पासून खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये वाढ झालेली नाही. या काळात कामगारांच्या मजुरीमध्ये १८ पैसे प्रति मीटर वाढ झाली असून, यंत्रमाग उद्योगातील कांडीवाला, जॉबर, वहिफणी अशा अन्य कामगारांच्या पगारामध्ये सुद्धा सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. तर विजेची बिले ३० टक्क्यांनी वाढली आहेत. त्याचबरोबर महागाईसुद्धा वाढत जात आहे. म्हणून सध्या खर्चीवाले यंत्रमागधारकांनी प्रतिमीटर मिळणारी साडे पाच पैसे मजुरी नऊ पैसे मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे, अशी भूमिका इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी मांडली. तसेच २ जानेवारीपासून इचलकरंजी क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनला वारंवार पत्रे देऊन सुद्धा त्यावर कोणताही विचार झालेला नाही. अखेर आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या खर्चीवाले यंत्रमागधारकाला प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा लागला. तरी व्यापाऱ्यांनी आपली नकारार्थी भूमिका सोडून दोन पावले पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
याबाबत बोलताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांनी, सन २०१३ मध्ये ठरल्याप्रमाणे
ज्या-ज्यावेळी यंत्रमाग कामगारांची मजुरी वाढली, त्या-त्यावेळी संबंधित खर्चीवाले यंत्रमागधारकांना कापड व्यापाऱ्यांनी मजुरीत वाढ केली आहे, असे सांगून ते म्हणाले, व्यापारी व कारखानदार यांच्यामध्ये त्यांच्या स्तरावर सामंजस्याने मजुरीवाढ झाली असून, त्यामध्ये व्यापारी असोसिएशन कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही.
गांधी यांच्या या विधानाला बैठकीतील अनेक यंत्रमाग प्रतिनिधींनी विरोध केला. आतापर्यंतच्या
गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार व्यापारी संघटनेने पुढाकार घेऊन खर्चीवाले कारखानदारांना मजुरीवाढ दिली आहे. त्याप्रमाणे आतासुद्धा द्यावी, असे यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे पडले. यावर बोलताना व्यापारी असोसिएशनचे घनश्याम इनानी म्हणाले, कापड उद्योगात मंदी आहे. त्यामुळे कापड व्यापारी आता आणखीन मजुरीवाढ देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांची मन:स्थिती तयार करून पुन्हा त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी या बैठकीला यावे लागेल. त्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी द्यावा.
चर्चेमध्ये विनोद कांकाणी, नारायण दुरूगडे, जीवन बर्गे, धर्मराज जाधव, आदींनी भाग घेतला. मात्र, यामध्ये तोडगा निघत नसल्यामुळे आणि वारंवार वादाचे प्रसंग होत असल्याने प्रांताधिकारी जिरंगे यांनी हस्तक्षेप केला. बैठक आठवडाभरातच बोलवली जाईल. दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी यावे, असे निर्देश प्रांताधिकारी जिरंगे यांनी दिले. (प्रतिनिधी)
फक्त मजुरीवाढीवेळीच
असोसिएशनची आठवण
इचलकरंजीमध्ये कापड व्यापाऱ्यांबरोबरच
कापड उत्पादन करणाऱ्या (सटवाले) कारखानदारांकडून ४० हजार यंत्रमागांवर बिमे दिली जातात. त्यांनाही या बैठकीला बोलावून मजुरीवाढीचा तोडगा काढावा, अशी सूचना व्यापारी असोसिएशनचे
इनानी यांनी केली. तसेच यंत्रमाग उद्योगाबाबत
यापूर्वी सरकार स्तरावर किंवा अन्य काही कारणांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवेळी होणाऱ्या संघर्षासाठी व्यापारी असोसिएशनला बोलविले जात
नाही. फक्त खर्चीवाले मजुरीवाढीवेळीच
व्यापारी असोसिएशनची आठवण येते, असेही ते म्हणाले.
मजुरीवाढीसाठी व्यापाऱ्यांनी
पुढाकार घ्यावा : आवाडे
खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये तीन वर्षांत
वाढ झाली नसली तरी या कालावधीत कामगारांना झालेली मजुरीवाढ, वीज बिले व अन्य घटकांच्या मजुरीतील वाढ, तसेच महागाईचा विचार करता
व्यापारी संघटनेने खर्चीवाले यंत्रमागधारकांना
मजुरीवाढ दिली पाहिजे, असे मत या बैठकीत
आलेल्या माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले. कामगार, यंत्रमागधारक व व्यापारी अशा
तिन्हीही घटकांमुळे वस्त्रनगरीचा विकास झालाय. पारंपरिक सामंजस्य कायम ठेवून व्यापाऱ्यांनी आता पुढाकार घेतला पाहिजे, असेही आवाडे यांनी सूचित केले.