चित्रपट महामंडळाची १५ तारखेला सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 11:10 AM2019-12-03T11:10:22+5:302019-12-03T11:27:26+5:30
मराठी चित्रपट व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सभा १५ तारखेला होत आहे. या सभेत मिलिंद अष्टेकर यांची विनयभंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर घडलेले नाट्य, महामंडळाने पाठवलेली नोटीस व सभासदत्व रद्दच्या मागणीचा मुद्दा कळीचा बनणार आहे.
कोल्हापूर : मराठी चित्रपट व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सभा १५ तारखेला होत आहे. या सभेत मिलिंद अष्टेकर यांची विनयभंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर घडलेले नाट्य, महामंडळाने पाठवलेली नोटीस व सभासदत्व रद्दच्या मागणीचा मुद्दा कळीचा बनणार आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची सभा म्हणजे वाद हे समीकरणच झाले आहे. यंदा ही सभा शाहू सांस्कृतिक भवन येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. २०१४ साली तत्कालीन उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्याविरोधात अभिनेत्री छाया सांगावकर यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मागील महिन्यात या आरोपातून अष्टेकर यांची निर्दोष मुक्तता झाली, यानंतर महामंडळाच्या दारातच छाया सांगावकर, अर्जुन नलवडे व सुरेंद्र पन्हाळकर यांच्या निषेधाचा फलक लावून त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
या घटनेनंतर महामंडळाने अष्टेकर यांना तुमचे सभासदत्व रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस काढली आहे, तर अष्टेकर हे महामंडळाच्या सभेत वरील तिघांचे सभासदत्व रद्दची मागणी करणार आहेत. या सगळ्या वादाचे पडसाद यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवर पडणार आहेत.
जुन्या जागेच्या विक्रीला विरोध
चित्रपट महामंडळाने कार्यालयासाठी रेल्वे स्टेशनसमोरील वास्तूची खरेदी केली आहे. सभेत महामंडळाचे जुने कार्यालय विक्रीवर चर्चा करण्यात येणार आहे; मात्र कोल्हापुरातील चित्रपट व्यावसायिकांचा जुन्या कार्यालयाच्या विक्रीला विरोध आहे. हे कार्यालय खासबाग या शहराच्या मध्यवर्ती परिसरात आहे. वास्तू विकण्याऐवजी तेथे कॉन्फरन्स हॉल, नव्या कलाकारांना तालमींसाठी भाडेतत्वावर देणे, असा उत्पन्नवाढीसाठी उपयोग करून घेता येईल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.