मजुरीवाढबाबतची बैठक निर्णयाविना

By admin | Published: December 26, 2016 12:20 AM2016-12-26T00:20:31+5:302016-12-26T00:20:31+5:30

उपोषणाचा नववा दिवस : इचलकरंजीतील कापड व्यापारी व यंत्रमागधारक प्रतिनिधींची बैठक

Meeting for labor welfare decision | मजुरीवाढबाबतची बैठक निर्णयाविना

मजुरीवाढबाबतची बैठक निर्णयाविना

Next

इचलकरंजी : खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये दरवर्षी वाढ देण्यात आली आहे. सध्या वस्त्रोद्योगामध्ये मंदी असल्याने मजुरीत आणखीन वाढ देणे अशक्य आहे. आगामी दोन-तीन महिन्यांत कापड व्यवसायात स्थिती सुधारण्याची शक्यता असून, त्यावेळी निश्चितपणे वाढ दिली जाईल, असे आश्वासन कापड व्यापारी संघटनेच्यावतीने रविवारी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना देण्यात आले. त्यामुळे यंत्रमागधारकांच्या मजुरीत वाढ देण्याविषयी आयोजित बैठक निर्णयाविना संपुष्टात आली.
‘मी स्वाभिमानी कारखानदार’ संघटनेच्यावतीने बाळ महाराज व अमोद म्हेत्तर यांचे गेले नऊ दिवस उपोषण सुरू असून, रविवारी संतप्त यंत्रमागधारकांनी कापड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. त्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथील प्रांताधिकारी कार्यालयात यंत्रमागधारक संघटना व कापड व्यापारी संघटना यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीसाठी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने, पोलिस उपधीक्षक विनायक नरळे, गुप्त वार्ताचे उपधीक्षक संजय पाटील, पोलिस निरीक्षक सतीश पवार, मनोहर रानमाळे, आदी उपस्थित होते.
बैठकीसाठी कापड व्यापारी यंत्रमागधारक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संयुक्तपणे चर्चा करणार नाहीत, असा निरोप आला. म्हणून यंत्रमागधारक संघटनांचे सतीश कोष्टी, दत्तात्रय कनोजे, सचिन हुक्किरे भेटले. त्यावेळी झालेल्या चर्चेत खर्चीवाले यंत्रमागधारकाला प्रतिपीक प्रतिमीटर साडेसहा पैसे मजुरी द्यावी, अशी अपेक्षा आहे; पण सध्या वस्त्रोद्योगात मंदी असल्यामुळे किमान सहा पैसे तरी मजुरी देण्यात यावी, अशी भूमिका मांडली.
त्यानंतर कापड व्यापारी संघटनेचे उगमचंद गांधी, घन:शाम इनाणी, राजाराम चांडक, आदींसह दहाजणांचे शिष्टमंडळ प्रांताधिकाऱ्यांना भेटले. २०१३ मधील करारानुसार प्रचलित असलेल्या मजुरीवर खर्चीवाले यंत्रमागधारकांना दरवर्षी मजुरीवाढ देण्यात आली आहे. शहरातील सुमारे तीस टक्के यंत्रमाग खर्चीवाले पद्धतीने चालविले जात आहेत. व्यापाऱ्यांकडे असलेल्या यंत्रमाग कारखानदारांची मजुरीवाढीविषयी कोणतीही तक्रार नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
व्यापारी निघून गेल्यानंतर यंत्रमागधारक असोसिएशनचे पदाधिकारी पुन्हा प्रांताधिकाऱ्यांना भेटले, पण कोणताही निर्णय न होता रविवारची बैठक संपुष्टात आली. (प्रतिनिधी)

राज्यमंत्री खोतकर यांचा आज दौरा
यंत्रमाग उद्योगाला वीजदर सवलत, व्याजदराचे अनुदान अशा प्रकारच्या पॅकेज योजनेतून ऊर्जितावस्था मिळावी, अशा प्रकारचा अहवाल शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. ठाकरे यांनी वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना इचलकरंजी येथील उपोषणस्थळाला भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता राज्यमंत्री खोतकर इचलकरंजी दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.

Web Title: Meeting for labor welfare decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.