‘एलबीटी’साठी १५ फेब्रुवारीपूर्वी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 12:35 AM2017-02-03T00:35:47+5:302017-02-03T00:35:47+5:30
केंद्रीय अर्थमंत्री आज करणार चर्चा
कोल्हापूर : कोल्हापुरातील एलबीटी असेसमेंटमध्ये निर्माण झालेल्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी, चेंबर आॅफ कॉमर्सचे शिष्टमंडळ यांची राज्य शासनस्तरावर १५ फेब्रुवारीपूर्वी संयुक्त बैठक आयोजित करू, अशी ग्वाही नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली.कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसह मंत्रालयात नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन चर्चा केली. अध्यक्ष गांधी यांनी त्यांना लेखी निवेदन दिले. दरतफावतीमुळे येणाऱ्या अडचणी व त्यामुळे व्यापारी-उद्योजकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची कल्पना त्यांनी दिली. या सर्व विषयांवर संयुक्त बैठकीत चर्चा करून समाधानकारक तोडगा काढण्यात येईल. व्यापारी, उद्योजकांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सचिव म्हैसकर यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे जनरल सेक्रेटरी सागर नगारे, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबरचे महामंत्री स्वप्निल शहा उपस्थित होते. (प्रतिनिधी)
केंद्रीय अर्थमंत्री आज करणार चर्चा
अर्थसंकल्पाबाबत व्यापार, उद्योग जगताच्या प्रतिक्रिया, अपेक्षा जाणून घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोषकुमार गंगवार, अर्जुन राम मेघवाल हे व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी आज, शुक्रवारी संवाद साधणार आहेत. नवी दिल्लीतील या बैठकीसाठी ‘फिक्की’चे संचालक ललित गांधी यांना निमंत्रित केले आहे.
सुनावणीस हजर राहण्याचे आवाहन
एल.बी.टी. कर निर्धारणाच्या सुनावणीस सर्व नोंदणीकृत व्यापारी, फर्म यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे. सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास स्थानिक संस्था कर नियम २०११ चे ३३ (५) व (६) प्रमाणे योग्य निर्णयशक्तीनुसार स्थानिक संस्था कराची रक्कम निर्धारित करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.