‘लाईफ इन्शुरन्स एम्प्लॉईज’ सोसायटीची सभा दहा मिनिटात गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:20+5:302021-04-02T04:23:20+5:30
कोल्हापूर : दि लाईफ इन्शुरन्स एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची ऑनलाईन वार्षिक सभा दहा वर्षातील चुकीचा कारभार झाकण्यासाठी अवघ्या ...
कोल्हापूर : दि लाईफ इन्शुरन्स एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची ऑनलाईन वार्षिक सभा दहा वर्षातील चुकीचा कारभार झाकण्यासाठी अवघ्या दहा मिनिटातच गुंडाळल्याचा आरोप संस्थेच्या विरोधी गटाचे सुजय म्हेत्रे, संग्राम मोरे, निखील कुलकर्णी आदींनी पत्रकाद्वारे केला. या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवून झालेली सभा रद्द समजून ती नव्याने घ्यावी, अशी मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
क्रेडिट सोसायटीची २०१९-२०ची ऑनलाईन सभा दिनांक २७ मार्च रोजी घेतली. याविषयी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अहवाल वाचन न करताच प्रश्नोत्तराला प्रारंभ झाला. यावेळी अहवालातील असंख्या चुका दाखवल्या, त्याकडे दुर्लक्ष करुन सभा रेटली. रिझर्व्ह फंड, पीएमसी बॅंक बुडीत ठेव तरतूद, एनपीए तरतूद, अनामत खात्यामधील मोठी रक्कम, थकबाकी, गुंतवणुकीवरील येणे व्याज तफावत, विनावेतन सेवा खर्च वाढ, सॉफ्टवेअर खरेदी घसारा व इतर विषयांवर उत्तर देण्याचे टाळून सभा गुंडाळली. सभासदांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांवर चुकीचे आरोप केले. या सोसायटीच्या चुकीच्या कारभाराबाबत सहकार खाते व न्यायालयात दाद मागणार असल्याचा दावा विरोधकांनी पत्रकाद्वारे केला. या पत्रकावर सुजय म्हात्रे, संग्राम मोरे, निखील कुलकर्णी, शिवाजी हंचनाळे, भरत उरुणकर, युवराज कांबळे, राजाराम सुतार, संजय वडगावकर, पृथ्वीराज माने आदींच्या सह्या आहेत.