Maharashtra Vidhan Sabha 2019 : सभा महायुतीची; परंतु त्यात शिवसेनाही बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:02 PM2019-10-13T18:02:25+5:302019-10-13T18:04:56+5:30
कोल्हापूर येथे रविवारी झालेल्या महायुतीच्या प्रचारार्थ झालेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेत भाजपचा आणि त्यातही कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांचाच जास्त प्रभाव राहिल्याचे दिसून आले. सभास्थळी शिवसेनेचा एकही झेंडा नव्हता आणि सभेकडे शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या दोन आमदारांसह दोन्ही खासदारांनीही पाठ फिरविली.
कोल्हापूर : येथे रविवारी झालेल्या महायुतीच्या प्रचारार्थ झालेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेत भाजपचा आणि त्यातही कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांचाच जास्त प्रभाव राहिल्याचे दिसून आले. सभास्थळी शिवसेनेचा एकही झेंडा नव्हता आणि सभेकडे शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या दोन आमदारांसह दोन्ही खासदारांनीही पाठ फिरविली.
सभेला कर्नाटक व सोलापूरकडूनही आलेल्या वाहनांची संख्या लक्षणीय होती.
ही सभा भाजप-शिवसेनेसह महायुतीची सभा असल्याचे अगोदरही जाहीर करण्यात आले होते. सभेतही प्रत्येक नेत्यांनी भाजप-शिवसेना, रासप, रिपाइं, शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांची दखल भाषणात घेतली; परंतु सभास्थळी अन्य पक्षांचा झेंडा सोडाच; त्यांचा कोणताही नेता या सभेकडे फिरकला नाही.
व्यासपीठासमोरील बाजूसही महाडिक समर्थक कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती. त्यामुळेच महाडिक हे नुसते नाव जरी घेतले तरी त्याला जल्लोषी प्रतिसाद मिळत होता. महायुतीच्या उमेदवारांची गृहमंत्री शहा यांनी ओळख करून देतानाही अमल महाडिक यांच्यावेळी जल्लोष झाला व इतर उमेदवारांची नावे वाचून दाखविल्यावर फारशा कुणी टाळ्याही वाजविल्या नाहीत. सभास्थळी सुरुवातीपासूनच सभा संपेपर्यंत ‘दक्षिणेत अमल... पुन्हा कमळ’ हेच गाणे वाजत होते.
व्यासपीठाच्या मागील बाजूस लावलेल्या फलकावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता; परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो मात्र वापरला नसल्याने त्याचीही चर्चा झाली. आमदारांच्या फोटोमध्येही आमदार सुरेश हाळवणकर भाजपचे ज्येष्ठ आमदार असूनही त्यांचा फोटो सहाव्या क्रमांकावर लावण्यात आला होता.
कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे जरी शिवसेनेचे असले तरी ते महायुतीचे म्हणून निवडून आले आहेत; परंतु त्यांना कोणतेच निरोप नसल्याने ते सभेला उपस्थित नव्हते. आमदार चंद्रदीप नरके व आमदार सत्यजित पाटील यांनीही सभेपेक्षा रविवारी मतदारसंघात प्रचारदौरे करण्यास प्राधान्य दिले.
शिवसेनेचे जे उमेदवार सभेला आले, त्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना या सभेला आणले नव्हते. ते व्यक्तिगत आपापल्या गाडीतूनच सभेसाठी आले. व्यासपीठावर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची ओळख करून दिली असली तरी फलकावर मात्र फक्त भाजपचेच कमळ चिन्ह झळकत होते. तिथेही शिवसेनेचा धनुष्यबाण गायब केला होता.
महायुतीची सभा म्हणून या प्रमुख दोन्ही पक्षांकडून जे एकत्रित शक्तिप्रदर्शन या सभेच्या निमित्ताने व्हायला हवे होते, तसे झाल्याचे दिसले नाही. ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार अमल महाडिक यांच्यासाठीच ही सभा घेतल्याचे चित्र दिसत होते.
बंडखोरांना दम
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सभेतही दोन्ही पक्षांच्या बंडखोरांना जाता-जाता दम दिला. ते म्हणाले, ‘बंडखोरांना मी सांगू इच्छितो की, महायुतीशी द्रोह आम्ही सहन करणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही.’