शिक्षणाधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सदस्यांचा सभात्याग
By admin | Published: May 25, 2016 01:08 AM2016-05-25T01:08:44+5:302016-05-25T01:11:24+5:30
शिक्षण समितीत धुसफूस : कामे होत नसल्याचा आरोप; तक्रारींची दखल घेत नसल्याने बदलीची मागणी
कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले मनमानी व एकतर्फी कारभार करीत असल्याचा आरोप करीत सभापती अभिजित तायशेटे यांच्यासह नऊ सदस्यांनी शिक्षण समितीच्या मंगळवारच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यातील धुसफूस चव्हाट्यावर आली. समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले आहे. दुपारी एक वाजता बैठकीस प्रारंभ झाला. शिक्षक बढती, पदोन्नती, बदली या प्रक्रिया पारदर्शकपणे राबविल्यामुळे शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी एस. व्ही. पाटील, संभाजी लोहार यांनी प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव केला. त्या ठरावावर सदस्यांनी भाष्य केले नाही. दरम्यान, महिन्यापूर्वी गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील मुख्याध्यापकांना आठवीचा वर्ग बेकायदेशीरपणे सुरू केल्याच्या आरोपावरून निलंबित केले. त्यांचे निलंबन मागणी करूनही मागे का घेतले नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यावर चौगुले यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सभापती तायशेटे, सदस्य राहुल देसाई, अर्जुन आबिटकर, बाबासाहेब माळी, शिवप्रसाद तेली, महेश पाटील, सुजाता पाटील, मंदा घाटगे, स्वाती ढवण यांनी सभात्याग केला.
त्यानंतर सभापती तायशेटे यांच्या कक्षात पत्रकारांना माहिती देताना आबिटकर म्हणाले, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले शिक्षकांच्या तक्रारींची दखल घेत नाहीत. सदस्यांनी कोणतेही प्रशासकीय काम सांगितल्यास सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. शिंगणापूर येथील निवासी शाळेसंबंधी दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. त्या बैठकीस पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले नाही. जिल्ह्णाबाहेर जाण्यासाठी अर्ज केलेल्या शिक्षकांची अडवणूक करीत आहेत. त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची बदली करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्याकडे करणार आहे. (प्रतिनिधी)