सर्किट बेंचबाबत सोमवारी बैठक, २६ फेब्रुवारीला मुख्य न्यायाधीशांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 05:10 PM2019-02-08T17:10:39+5:302019-02-08T17:11:34+5:30
कोल्हापूर येथील सर्किट बेंचबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी २६ फेब्रुवारीला खंडपीठ कृती समितीला निमंत्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाची सोमवार (दि. १८) न्यायसंकुलामध्ये बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती बारचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी शुक्रवारी दिली.
कोल्हापूर : येथील सर्किट बेंचबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी २६ फेब्रुवारीला खंडपीठ कृती समितीला निमंत्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाची सोमवार (दि. १८) न्यायसंकुलामध्ये बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती बारचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी शुक्रवारी दिली.
कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्न गेली काही वर्षे ऐरणीवर आला असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांतील वकिलांनी या प्रश्नासंबंधी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घ्यावयाचा असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
खंडपीठ कृती समितीने मुख्य न्यायाधीशांची वेळ मागितली होती. त्यानुसार २६ फेब्रुवारीला बैठकीचे निमंत्रण कृती समितीला आले आहे. मुख्य न्यायाधीशांसमोर सर्किट बेंच संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव सादर केला आहे. शासनाने जागेसह निधीची उपलब्धता करून देण्याचेही लेखी पत्र दिले आहे. आपण तत्काळ मंजुरी द्यावी, अशी विनंती शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.
गेल्या ३४ वर्षांच्या संघर्षाचा आढावा यावेळी सांगितला जाणार आहे. कोणी काय बोलायचे यासंबंधी जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाची बैठक सोमवारी घेण्यात आली आहे. त्यानंतर सहा जिल्ह्यांतील कृती समिती सदस्यांची बैठक घेऊन मुख्य न्यायाधीशांसोबत चर्चेला कोणी जायचे त्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत, असे अॅड. चिटणीस यांनी सांगितले.