भुदरगड पतसंस्था व ‘भू-विकास’च्या कर्जदारांच्या प्रश्नावर सोमवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:34 AM2021-02-26T04:34:00+5:302021-02-26T04:34:00+5:30
कोल्हापूर : भुदरगड पतसंस्था व भू-विकास बँकेच्या कर्जदारांना बजाविलेल्या नोटिशींबाबत सोमवारी (दि. १ मार्च) शासकीय विश्रामगृहावर बैठक होत आहे. ...
कोल्हापूर : भुदरगड पतसंस्था व भू-विकास बँकेच्या कर्जदारांना बजाविलेल्या नोटिशींबाबत सोमवारी (दि. १ मार्च) शासकीय विश्रामगृहावर बैठक होत आहे. दुपारी चार वाजता होणाऱ्या या बैठकीत नोटीसधारकांनी कागदपत्रांसह हजर राहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील भुदरगड पतसंस्था व भू-विकास बँक या दोन्ही संस्था अवसायनात निघाल्याने अवसायकामार्फत संस्थांचे कामकाज सुरू आहे. या अवसायकांनी संस्थेच्या थकबाकीदार कर्जदारांना कर्ज भरण्यासाठी नोटिसा बजाविल्या आहेत. यामुळे या कर्जदार सभासदांमध्ये रोष निर्माण झाला आहे. अवसायकामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात ज्या कर्जदारांनी कर्जे घेतली आहेत, त्यांनी २००८ पूर्वीच्या सरळव्याजानुसार कर्ज भरण्याची सवलत देण्यात आली होती. तसेच त्यांना वन टाईम सेटलमेंट करण्याचीही मुभा देण्यात आली होती. परंतु कर्जदारांना याबाबतची योग्य माहिती व मार्गदर्शन नसल्यामुळे कर्जदारांमध्ये अस्वस्थता आहे.
भू-विकास बँकेतील कर्जदारांच्या कर्ज वसुलीस स्थगिती देण्याची मागणी मागील सरकारमध्ये सर्वपक्षीय आमदारांनी केल्यामुळे तत्कालीन सहकारमंत्री यांनी भू-विकास बँकेतील कर्जदारांच्या कर्ज वसुलीस स्थगिती देत कर्जाची वसुली बँकेच्या अस्तित्वात असलेल्या प्रॉपर्टीमधून करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु अद्यापही काही कर्जदारांना प्रशासक मंडळाकडून नियमबाह्य पध्दतीने नोटिसा बजावून नागरिकांना नाहक त्रास देण्याचे काम सुरू असून याबाबत अनेक तक्रारी कर्जदारांमार्फत येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.