मुख्यमंत्र्यांसमवेत २०ला खासदारांची बैठक
By admin | Published: November 18, 2014 12:46 AM2014-11-18T00:46:34+5:302014-11-18T01:03:06+5:30
राजू शेट्टी : राज्याच्या प्रश्नांची होणार चर्चा ; सह्याद्री अतिथीगृहात आयोजन
कोल्हापूर : राज्यातील केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी राज्यभरातील खासदारांची येत्या गुरुवारी (दि.२०) सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
राज्यात नव्याने मंत्रिमंडळ सत्तारूढ झाले की नवे मुख्यमंत्री खासदारांशी चर्चा करतात हा रिवाज आहे. त्यानुसार ही बैठक होत आहे. राज्यभरातील अनेक प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित आहे. ते जसे एखाद्या जिल्ह्यापुरते मर्यादित आहेत तसेच ते राज्याशीही संबंधित आहेत. अशा सगळ््या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य म्हणून एकत्रित प्रयत्न झाल्यास प्रश्नाची सोडवणूक होण्यास त्याची नक्कीच मदत होऊ शकते, असे कोणते प्रश्न आहेत हे समजून घेतानाच प्रत्येक खासदाराशी संवाद साधता यावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे.
शेट्टी यांच्याकडून ‘पेरिड’ दत्तक
खासदार शेट्टी यांनी शाहूवाडी तालुक्यातील पेरिड हे गाव विकासासाठी दत्तक घेतले आहे. त्याअंतर्गत उद्या (मंगळवारी) इंद्रजित देशमुख यांचे प्रबोधनपर व्याख्यान गावात आयोजित केले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर मलकापूर पासून दीड किलोमीटरवर हे सुमारे अडीच हजार लोकवस्तीचे गाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील एक गाव घेवून ते आदर्श करून दाखवावे, असे
आवाहन केले होते. त्यानुसार शेट्टी यांनी हे गाव निवडले आहे. शाहूवाडी मतदारसंघांने शेट्टी यांना दोन्ही लोकसभा निवडणुकीत भक्कम पाठबळ दिले. त्यामुळे त्याच तालुक्यातील गावाचा विकास करायचा असे त्यांनी ठरविले होते.
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार राऊ धोंडी पाटील यांचे हे गाव. या गावाचे वैशिष्ट्य असे की कोणत्याच संस्थेची या गावात कधीच निवडणूक झालेली नाही. तसे राजकीयदृष्ट्या धगधगते असूनही गावांतील लोक निवडणूक न घेण्याचा शहाणपणा अगोदरच दाखवत आले असल्याने गाव ‘आदर्श’ करण्यातही ते पुढाकार घेतील, असा विश्वास शेट्टी यांना आहे. पोलीस व लष्करामध्येही या गावातील जवान मोठ्या प्रमाणावर आहेत.
राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी यापूर्वीच चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द या गावाची निवड केली आहे. (प्रतिनिधी)